अकरावीसाठी अर्ज भरण्याची आज अखेरची मुदत
By admin | Published: June 27, 2017 08:00 AM2017-06-27T08:00:26+5:302017-06-27T08:00:26+5:30
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्जाचे दोन्ही भाग भरण्याची मंगळवारी अंतिम मुदत आहे. अद्यापही भाग १ साठी लॉगिन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्जाचे दोन्ही भाग भरण्याची मंगळवारी अंतिम मुदत आहे. अद्यापही भाग १ साठी लॉगिन करूनही दोन्ही भाग अर्ज पूर्ण न भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे सहा हजार आहे. या विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण न भरल्यास त्यांना प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे केंद्रीय प्रवेश समितीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रात आवश्यक कागदपत्रे सादर करून अर्जात झालेली चूक दुरुस्त करता येणार आहे, असे समितीकडून सांगण्यात आले.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकाक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत अर्जाचे दोन्ही भाग पूर्ण करण्याची अंतिम मुदत बुधवारी (दि. २७) दुपारी ४ वाजेपर्यंत आहे. या मुदतीनंतर विद्यार्थ्यांना अर्ज भरणे किंवा त्यात दुरुस्ती करता येणार आहे. मंगळवारअखेरपर्यंत ८५ हजार ८०५ विद्यार्थ्यांनी भाग १ साठी लॉगिन केलेले आहे. त्यापैकी ७१ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी भाग १ व भाग २ भरून अर्ज पूर्ण केले आहेत. केवळ भाग १ पूर्ण केलेल्या परंतु अॅपु्रव्ह न केल्यामुळे भाग २ भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५ हजार ४४० एवढी आहे. तसेच भाग २ मध्ये लॉगिन केलेल्या परंतु पसंतीक्रम भरून अर्ज पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७७२ आहे.
भाग १ व भाग २ अॅप्रुव्हलसह पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अर्ज अपूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा या यादीत समावेश केला जाणार नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासून ते अपूर्ण असल्यास माहिती पुस्तिकेत नमूद केलेल्या कोणत्याही मार्गदर्शन केंद्रांवर आवश्यक कागदपत्रांसह जाऊन अर्ज अपु्रव्ह करून घ्यावा. पालिका हद्दीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळेत जाऊन अर्ज अॅप्रुव्ह करून घ्यावा, असे आवाहन समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी केले आहे.