आज एसपीव्हीची पहिली बैठक
By admin | Published: April 18, 2016 03:06 AM2016-04-18T03:06:18+5:302016-04-18T03:06:18+5:30
महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या स्पेशल पर्पज व्हेईकलची (एसपीव्ही) पहिली बैठक
पुणे : महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या स्पेशल पर्पज व्हेईकलची (एसपीव्ही) पहिली बैठक सोमवारी सकाळी दहा वाजता महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
एसपीव्हीची ही पहिलीच बैठक असल्याने या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये कंपनीचे आर्थिक वर्ष निश्चित करणे, अध्यक्षांना अधिकार देणे, कंपनीच्या प्राथमिक खर्चांना मान्यता देणे, तातडीच्या प्रकल्पांना मान्यता देणे, कोणते प्रकल्प सुरू करता येतील याबाबात निर्णय घेणे, शेअर्स वितरणाचा निर्णय घेणे, कंपनीचा अधिकृत शिक्का तयार करणे, बँकेत खाते उघडणे, कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संमतीने बँक व्यवहारांना मान्यता घेणे, सल्लागार कंपन्यांचे मार्गदर्शन घेण्याबाबत अध्यक्षांना अधिकार देणे आदी निर्णय घेतले जाणार आहे.
एसपीव्हीच्या संचालक मंडळामध्ये महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यासह ६ लोकप्रतिनिधांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर विभागीय आयुक्त, केंद्र व राज्य शासनाचे प्रतिनिधी संचालक मंडळात असणार आहेत. स्मार्ट सिटीसाठी केंद्राकडून देण्यात येणारा दोन वर्षांचा १९४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
कंपनीचा मोनोग्राम मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तयार करून संचालक मंडळापुढे सादर करावा. शासनाकडील ठराव ११ एप्रिल व १२ एप्रिलच्या पत्रांची नोंद घ्यावी. शासनाकडून नियमांमध्ये होणाऱ्या बदलाबाबतची नोंद संचालक मंडळाने घेऊन यासंदर्भात खास सभा बोलावून संचालक मंडळाची मान्यता घेण्यात येणार आहे.