महाराष्ट्रात हिंसाचाराला कारण ठरलेल्या कोरेगाव-भीमामध्ये आज ग्रामस्थांची महत्वपूर्ण बैठक, निर्णयाकडे लागले सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 09:35 AM2018-01-05T09:35:20+5:302018-01-05T10:58:42+5:30
कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांनी आता सामोपचाराची भूमिका घेतली आहे. शुक्रवारी कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांची बैठक होणार आहे.
पुणे - कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांनी आता सामोपचाराची भूमिका घेतली आहे. शुक्रवारी कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांची बैठक होणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन हे ग्रामस्थ आपली भूमिका मांडतील. 1 जानेवारीला कोरेगाव-भीमामध्ये दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जाळपोळ, वाहनांची तोडफोड, रास्ता रोको, रेल रोको, मार्चे, आंदोलने झाली. त्यामुळे दोन समाजांमधील तेढ अधिक वाढून राज्यातील वातावरण गढूळ झाले.
त्या पार्श्वभूमीवर आता कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांनी सामंज्यसाची भूमिका घेत वाद मिटवण्याचा निर्णय घेतला आहे. गावक-यांनी परस्पराविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय होऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोरेगाव-भीमामध्ये नेमक काय घडलं ? कशामुळे इतका हिंसाचार उफाळून आला? त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह अन्य माहिती घेत आहेत. बंदच्या दरम्यान हिंसाचार करणा-यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरु केली आहे. या कारवाई दरम्यान कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थ सुद्धा अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे गावक-यांनी आता सामंज्यसाची भूमिका घेतली आहे.
नगरमध्ये आज दलित संघटनांचा मोर्चा
कोरेगाव-भीमा घटनेतील दोषींविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी फुले, शाहू, आंबेडकर, परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात शहरासह जिल्ह्यातून भीमसैनिक उपस्थित राहतील ,अशी माहिती सुनील क्षेत्रे व अजय साळवे यांनी गुरुवारी येथे दिली.
नगर-पुणे रोडवरील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभा घेऊन जिल्हाधिका-यांना निवेदन दिले जाणार असल्याचे साळवे म्हणाले.
राहुल फटांगडेच्या कुटुंबाला २५ लाख द्या
कोरेगाव भीमा येथील दंगलीत मरण पावलेल्या राहुल फटांगडे या तरुणाच्या कुटुंबियांना शासनाने तातडीने २५ लाख रुपये मदत आणि घरातील एक जणाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणाले की, भीमा- कोरेगाव घटनेचा मराठा क्रांती मोर्चाने जाहीर निषेध नोंदविला आहे. या घटनेला भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे हे जबाबदार असल्याचे समोर आल्यानंतरही पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नाही. असे असताना मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावतीचे भाजप आमदार अनिल बोंडे यांनी या घटनेमागे मराठा क्रांती मोर्चा असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चा निषेध करीत असून, दोन समाजात तेढ निर्माण करणाºया आमदार बोंडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी मोर्चा करीत आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही ५८ मोर्चे काढले. आमचे मोर्चे कोणत्याही समाजाविरोधात नव्हते, हे मागासवर्गीय समाजाला माहीत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दलित वसाहतीमध्ये जाऊन बैठका घेत आहेत.