बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:47 PM2017-09-29T12:47:57+5:302017-09-29T13:07:58+5:30

बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून १६ आॅक्टोबरला मतदान होत आहे. ३५ हजार ३८५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Today's last day to fill the application for the 13th Grampanchayat elections in Baramati taluka | बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस

बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस

Next
ठळक मुद्दे१३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी दि. २९ अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून १३ अधिकाºयांची नेमणूक१३ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटात ही निवडणूक होईल, असे चित्र आहे.

बारामती : पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्यांतील निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. आज (दि. २९) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. 
बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी ३५ हजार ३८५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून १३ अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. यंदा प्रथमच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आॅनलाइन होत आहे. ऐन दिवाळीत निवडणुकीची धामधूम असणार आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी निकालाचे फटाके फुटणार आहेत.
लोणी भापकर, काºहाटी, सोनकसवाडी, वाणेवाडी, कुरणेवाडी, मासाळवाडी, मुरुम, मोरगाव, पळशी, गडदरवाडी, पणदरे, सोरटेवाडी, वाघळवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यंदा ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. इच्छुक उमेदवारांना आॅनलाइन निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती होण्यासाठी प्रशिक्षण देखील  देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशनपत्र भरण्याची सुरुवात  दि. २२ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्याची सुविधा सर्व महा-ई-सेवा केंद्र व संग्राम केंद्र येथे करण्यात आली आहे.  
निवडणुकीविषयी माहिती निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला मतदान होत आहे. बारामती एमआयडीसीतील रिक्रिएशन हॉलमध्ये १७ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यंदा थेट जनतेमधून सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे विजयी सरपंच आणि विजयी ग्रामपंचायत सदस्याचा, असे दोन निकाल जाहीर होणार आहेत. 

सणासुदीला येणार गटबाजीला उधाण
ऐन दसरा दिवाळी सणाच्या दिवसांमध्ये बारामती तालुक्यात निवडणुका होणाºया गावांमध्ये गटबाजीला उधाण आले आहे. १३ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटात ही निवडणूक होईल, असे चित्र आहे. काही ठिकाणी शेतकरी कृती समिती निवडणुकीमध्ये सक्रिय होणार आहे.भाजपदेखील निवडणुकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजप काही ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग ,तर काही ठिकाणी राष्ट्रवादी विरोधी गटाला पाठबळ देण्याची शक्यता आहे. 

...यंदा प्रथमच ‘ई-कार्यकर्ता’ प्रचार करणार
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी हायटेक पद्धतीने मतदान होणार आहे. सर्व युवा मतदारांच्या हाती इंटरनेटने जोडलेले मोबाईल आहेत. त्यामुळे युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावर निवडणूक लढविणारे उमेदवार ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले आहेत. राजकीय पक्षदेखील यामध्ये मागे नाहीत. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच ‘ई-कार्यकर्ता’ प्रचार करताना दिसणार आहे.त्यासाठी राजकीय पक्षांनी खास प्रशिक्षक नेमून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले आहे.

सरपंचपदाच्या २६ जागांसाठी ६८ अर्ज 
इंदापूर : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीच्या पूर्वसंध्येला सरपंचपदाच्या २६ जागांसाठी ६८ तर सदस्य पदाच्या २४६ जागांसाठी १९९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत,अशी माहिती तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिली. शुक्रवारी (दि.२९) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. आत्तापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जात सरपंचपदासाठी सर्वाधिक अर्ज रेडणी (८) ग्रामपंचायतीसाठी आले आहेत. सदस्य पदासाठी सर्वाधिक प्रत्येकी २० अर्ज मदनवाडी व म्हसोबाची वाडी या दोन ग्रामपंचायतीसाठी आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. 

राजगुरुनगरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड
राजगुरुनगर : खेड तालुक्यात २३ गावांतील ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती. अनेकांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरले. कुठे भोजनावळी, तर कुठे आमिषे दाखविली जात आहेत. ‘कुठं कुठं जायाचं पंगतीला’, असाच प्रश्न त्यांना मतदारांना पडल्याचे चित्र दिसत आहे. लढती अटीतटीच्या होण्याची शक्यता आहे. ३ आॅक्टोबर रोजी सादर अर्जाची छाननी होणार आहे. ५ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 

Web Title: Today's last day to fill the application for the 13th Grampanchayat elections in Baramati taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.