जवखेडा हत्याकांडाबाबत पुण्यात आज बैठक
By admin | Published: November 30, 2014 10:01 PM2014-11-30T22:01:41+5:302014-12-01T00:11:44+5:30
भारत पाटणकर : विविध विषयांवर चर्चा
सातारा : ‘नगर जिल्ह्यातील मागासवर्गीय नागरिकांवर होणारे अत्याचार आणि जवखेडा हत्याकांडप्रकरणी शासनाकडे प्रभावी भूमिका मांडण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवार, दि. १ डिसेंबर रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे,’ अशी माहिती श्रमिकचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘जवखेडा हत्याकांड हे राज्यातील संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील आंबेडकरवादी, फुले, शाहू, मार्क्स, फुले, आंबेडकरवादी, डाव्या समाजवादी कम्युनिस्ट पक्ष संघटना एकत्र जमून महाराष्ट्रातील बौद्ध, दलित, आदिवासी या घटकांवर होणाऱ्या जातीयवादी आणि कत्तलखोर हल्ल्यांबाबात आणि खुनाच्या साखळीबाबत चर्चा केली. यावेळी प्रतिनिधींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण, कृतीची एकसंध झाली नाही. ही कृती राज्यभरातील सर्व शोषित जातींमधील जनतेच्या सहभागाने झाली तर लाखोंच्या घरात असलेल्या जनतेला कृतिशील बनवू शकते. हल्लेखोरांवर वचक बसवू शकते. सोमवारी होणाऱ्या बैठकीत कृती कार्यक्रम राबवावा, राज्यभर जनजागृतीचे रान उठवावे, परिणामकारक आंदोलन ठेवण्याची तयारी करावी, टग्या आणि धनदांडग्यांना एकटे पाडण्यासाठी प्रयत्न करावेत आणि स्त्रियांचे आणि मुलींचे प्रश्न घेणाऱ्या संघटनांचा सहभाग घ्यावा. तसेच कायमस्वरूपी असा मंच जातीय शोषण आणि अत्याचारांना संपवण्याच्या एककलमी कार्यक्रम तयार करावा,’ या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)