शुल्कवाढीविरोधात आज आंदोलन
By Admin | Published: January 9, 2017 03:30 AM2017-01-09T03:30:55+5:302017-01-09T03:30:55+5:30
शिकाऊ परवाना, मोटार वाहन नोंदणीसह विविध शुल्कांमध्ये मोठी वाढ केल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी विविध माल व प्रवासी वाहतूक संघटनांच्या
पुणे : शिकाऊ परवाना, मोटार वाहन नोंदणीसह विविध शुल्कांमध्ये मोठी वाढ केल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी विविध माल व प्रवासी वाहतूक संघटनांच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयात आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनामध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.
केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून विविध शुल्कांमध्ये मोठी वाढ केली आहे. याबाबतची अधिसूचना २९ डिसेंबरला जारी करण्यात आली. यामध्ये शिकाऊ परवान्याचे शुल्क ३१ रुपयांवरून १५० रुपये करण्यात आले आहे. या पटीतच मोटार वाहन नोंदणी, पत्ता बदलणे, ड्रायव्हिंग स्कूल नोंदणी, तपासणी अशा विविध प्रकारच्या शुल्कांमध्ये मोठी वाढ केली आहे. या वाढीविरोधात विविध वाहतूक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी आहे.