इंद्रायणीनगरात आज समस्यांचा जागर
By admin | Published: December 24, 2014 01:26 AM2014-12-24T01:26:06+5:302014-12-24T01:26:06+5:30
रखडलेल्या योजना, प्रकल्प, विविध प्रश्नांना वाचा फोडून ‘पिंपरी चिंचवडचा ऱ्हास आता बास’ ही विशेष मोहीम ‘लोकमत’ने सुरू केली आहे.
पिंपरी : रखडलेल्या योजना, प्रकल्प, विविध प्रश्नांना वाचा फोडून ‘पिंपरी चिंचवडचा ऱ्हास आता बास’ ही विशेष मोहीम ‘लोकमत’ने सुरू केली आहे. यातून नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न जनतेसमोर आणून चर्चा घडविली जात आहे. ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम इंद्रायणीनगर प्रभागात बुधवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.
प्रभागातील सामान्य नागरिक, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशी चर्चा लोकमत आपल्या दारी उपक्रमातून घडवून आणली जाते. प्रश्न, समस्यावरील चर्चा व त्याचे निराकरण करणे हा लोकमतच्या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘लोकमत आपल्या दारी’ हा उपक्रम चिंचवड, मोरवाडी पिंपरी, शाहूनगरानंतर इंद्रायणीनगर प्रभागात होणार आहे. भोसरी औद्योगिक परिसरात वसलेल्या इंद्रायणीनगर भागातील नागरी प्रश्नावर चर्चा घडावी, प्रश्न सुटावेत, याच उद्देशाने इंद्रायणीनगर सेक्टर क्रमांक दोनमधील मिनि मार्केट येथे ‘लोकमत आपल्या दारी’चे आयोजन केले आहे.
यामध्ये नगरसेवक संजय वाबळे, नगरसेविका वर्षा मडेगिरी यांच्यासह प्रभागस्तरावरील अधिकारी सहभागी होत आहेत. त्यांच्यासमोर एम आयडीसी रस्त्याची झालेली दुर्दशा, भाजी मंडईचा प्रश्न, वाढलेले चोऱ्यांचे प्रमाण, सांडपाणी व्यवस्थेचा अभाव आदी प्रश्नावर सामान्यांना मते मांडता येणार आहे. (प्रतिनिधी)