आजचा ग्रामीण तरुण दिशाहीन होतोय : डॉ. श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:31 PM2018-05-22T13:31:29+5:302018-05-22T13:31:29+5:30
गावातील तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास महाराष्ट्राला गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल : श्रीपाल सबनीस
पुणे : गावातील तरुणांचा राजकारणाची खोटी आशा दाखवून राजकीय नेतृत्व तरुणांच्या डोक्यात हवा घालत आहे. ग्रामीण भागातील राजकारणामुळे तरुण पिढी दिशाहिन होत आहे. चंगळवाद जोपासणारे आणि पोसणारे हे राजकारण ग्रामीण तरुणांना कोणत्या थराला घेऊन जात आहे, याचा अंदाज कोणालाच येत नाही. तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास महाराष्ट्राला गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
संस्कृती प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि मेघा पाटील लिखीत ‘शेतकरी नवरा’ आणि ‘विस्कटलेली चौकट’ या दोन कादंब-यांचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड उपस्थित होते. यावेळी संस्कृती प्रकाशनाच्या संचालिका सुनिताराजे पवार, अमरसिंग देशमुख, वि.दा. पिंगळे आणि रमेश पाटील उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, ‘लाखोंचा पोशिंदाच आज चक्रव्युहात सापडलेला आहे. तंत्रज्ञानामुळे त्याच्यापर्यंत शहरी प्रगती आणि घडामोड पोहोचत आहेत. परंतु, प्रगतीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग त्यांना सापडत नाही. ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेतील वाढती तफावत त्यांना गोंधळात टाकत आहे.’
‘काळ्या मातीशी इमान राखत निष्ठेने वाटचाल करावी तर नक्की कोणत्या आशेवर, याबाबत शेतक-याच्या मनात व्यवस्थेने संभ्रम निर्माण केले आहेत. शहरातील चकचकीत जीवन त्यांना आकर्षित करते. परंतु, आकर्षक जीवनातील तडजोडींचा त्यांना अंदाज येत नाही. योग्य वेळी तो़डगा न मिळाल्यास अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागेल.’
अॅड. भास्करराव आव्हाड म्हणाले, ‘प्रत्येक लिखाण हे वाङ्मय या वर्गवारीत मोडू शकत नाही. त्या लिखाणाला वाङ्मयीन मुल्ये प्राप्त होण्यासाठी अनुभवाची धार लागणे आवश्यक असते. अस्वस्थेतून निर्माण होणारे वाङ्मय हे खरे साहित्य. अस्सल वाडमय हे सुसंवाद खुंटवणारे नसून ते सुसंवाद वाढवणारे असते.’
सुनिताराजे पवार, मेघा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वि.दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.