स्थायी समितीच्या अध्यक्षांची आज निवड
By admin | Published: March 29, 2017 02:54 AM2017-03-29T02:54:14+5:302017-03-29T02:54:14+5:30
महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ व राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस
पुणे : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ व राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार रेखा टिंगरे यांच्यात लढत होत आहे. समितीच्या १६ सदस्यांपैकी १० सदस्य भाजपाचे असल्याने मुरलीधर मोहोळ यांची निवड निश्चित आहे.
स्थायी समिती निवडणुकीसाठी २४ मार्च रोजी नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांची या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. नियमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर मतदान होऊन स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड जाहीर केली जाईल, अशी माहिती नगरसचिव सुनील पारखी यांनी दिली.
महापौर, उपमहापौरपदाप्रमाणेच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक विरोधकांकडून लढविली जात आहे. स्थायी समितीमध्ये भाजपाचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ०४, काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी १ असे १६ सदस्य आहेत. सर्व पक्षांनी एकत्र येऊन स्थायी समितीची निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करणार का, याची उत्सुकता असणार आहे.
(प्रतिनिधी)
30 मार्चला अंदाजपत्रक
बुधवारी स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड झाल्यानंतर लगेच गुरुवारी (दि. ३०) आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे.
पक्षीय बलाबल
भाजपा १०
राष्ट्रवादी काँग्रेस०४
काँग्रेस ०१
शिवसेना ०१
एकूण सदस्य १६