आजची तरुण पिढी सजग आणि जबाबदार : नाना पाटेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:10 AM2021-04-13T04:10:52+5:302021-04-13T04:10:52+5:30
पुणे : ‘आजच्या तरुण पिढीला बेजबाबदार म्हटले जाते, पण यांच्यापेक्षा जबाबदार आणि सजग मला कोणीही वाटत नाही. तरुणाईकडे बघूनच ...
पुणे : ‘आजच्या तरुण पिढीला बेजबाबदार म्हटले जाते, पण यांच्यापेक्षा जबाबदार आणि सजग मला कोणीही वाटत नाही. तरुणाईकडे बघूनच मी जिवंत आहे’, असे प्रतिपादन अभिनेते आणि समाजसेवक नाना पाटेकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, नाम फाउंडेशन, शिवम प्रतिष्ठान, निर्मला गजानन फाउंडेशन आणि प्रादेशिक रक्तपेढी ससून रुग्णालय यांच्या वतीने विद्यापीठात रक्तदान महाअभियान शिबिराचे आयोजन केले. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, डॉ. मनोहर चासकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, संजय चाकणे, प्रसेनजित फडणवीस, विलास उगले, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते.
नाना पाटेकर म्हणाले, कोरोनाचा हा काळ अत्यंत कठीण असून प्रत्येकाने आपापल्या परीने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे प्लेगच्या साथीतील कार्य सर्वांना ज्ञात आहे, तोच वसा विद्यापीठ पुढे घेऊन जात आहे. कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा असताना सामाजिक जाणिवेतून विद्यापीठ आपला खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करत आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे म्हणाले, कोरोनामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याने तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सुमारे ५०० महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येतील. एनएसएसच्या माध्यमातून रक्तदान करून रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
दरम्यान, विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात आयोजित शिबिरात रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सोमवारी झालेल्या या एकदिवसीय शिबिरात दुपारी दोन वाजेपर्यंत सव्वाशे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. अशा प्रकारचे शिबिर प्रत्येक महाविद्यालयात घ्यावे, अशा सूचना महाविद्यालयांना विद्यापीठाकडून करण्यात आल्या.
फोटो : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, नाम फाउंडेशन, शिवम प्रतिष्ठान, निर्मला गजानन फाउंडेशन आणि प्रादेशिक रक्तपेढी ससून रुग्णालय यांच्या वतीने विद्यापीठात रक्तदान महाअभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले.