एकत्र कुटुंबातील सदस्य भुकेलेल्यांची भागवतायत अन्नाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:33+5:302021-05-21T04:11:33+5:30
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात येणारा लॉकडाऊन असो की कडक निर्बंध याचा पहिला फटका हातावर पोट असलेल्या ...
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात येणारा लॉकडाऊन असो की कडक निर्बंध याचा पहिला फटका हातावर पोट असलेल्या नागरिकांना बसतो. रोजगारच बंद होत असल्याने भूक भागवायची कशी हा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर असतो. सरकारची मोफत शिवभोजन थाळी सर्वांपर्यंत पोहचतच असते असे नाही. आजही अनेकजण उपाशपोटी झोपत आहेत. यावर विचार करून मुंढव्यातील एका एकत्र कुटुंबात राहणाऱ्या सदस्यांनी उपनगरातील मुख्य रस्त्यावरील चौकात तसेच पदपथांवर राहणाऱ्या नागरिकांची भूक भागवण्यासाठी पुढाकार घेतला असून, पहिल्या लॉकडाऊनपासून आताच्या कडक निर्बंधात सेवा सुरू ठेवली आहे.
मुंढवा गावातील सूरज पवार व त्याच्या एकत्र कुटुंबातील १० सदस्य तसेच मित्रांनी एकत्रित येत मोफत जेवण वाटपाचे कार्य सुरू केले आहे. पदपथावरील नागरिकांना कडक निर्बंध लागू केल्याने उपाशीपोटी झोपावे लागते आहे, हे निदर्शनात आले. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान मोफत अन्नधान्याचे वाटप करण्याचे कार्य केले होते. आताही या नागरिकांना मोफत अन्नधान्याचे वाटप करण्याचा विचार केला. फक्त तेवढी मदत करून भूक भागत नाही. हे मागच्या अनुभवारून समजले होते. त्यामुळे घरूनच शिजवलेले तयार जेवण देण्याचा विचार केला. सुरुवातीला काही मित्रांनी एकत्र येऊन उपक्रम कसा राबवता येईल यावर विचार केला. कुटुंबातील सर्वच सदस्यांनी अन्नदानाच्या या यज्ञात सहभाग घेतला. गेल्या २० दिवसांपासून सुमारे १५० ते २०० नागरिकांना पोट भरेल एवढे पॅकेट तयार करून रोज वाटप केले जात असून, सर्व सुरळीत होईपर्यंत सेवा सुरू ठेवणार आहोत, असे सूरजने सांगितले.
मुंढवा, चंदननगर, येरवडा, घोरपडी, बंडगार्डन, सादलबाबा चौक आदी चौकातील नागरिकांना पॅकेटचे वाटप केले जाते. तसेच ससून रुग्णालयाच्या समोरील व्यक्तींना मदत केली जाते. ससूनमध्ये अनेक रुग्ण आहेत. त्यामुळे तेथे रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी असते. बाहेर बंद असल्याने त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होत असल्याचे लक्षात आले. त्यानुसार रुग्णांच्या नातेवाइकांना आग्रह करून जेवण दिले जाते. त्यांच्या मिळणाऱ्या आशीर्वादातून जीवांचे सार्थक झाल्यासारखे वाटते. ही वाईट वेळ लवकर दूर व्होवो, अशी प्रार्थना देवाकडे रोज करतो आहे, अशी भावना सूरजने व्यक्त केली.