ताथवडेत चक्क शौचालये गेले चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 07:08 PM2018-05-08T19:08:29+5:302018-05-08T19:08:29+5:30
स्मार्ट सिटी म्हणविल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात चक्क शौचालय चोरीला गेल्याची घटना घडली आहे .
बेलाजी पत्रे
वाकड (पिंपरी-चिंचवड) : शासकीय योजनांतील भ्रष्टचार उघड करण्यासाठी शेतकऱ्याने चक्क विहीर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याच पद्धतीने ताथवडेत चक्क शौचालय चोरीला गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक योगेश बबन फल्ले (वय ३३, रा. रामनगर, रहाटणी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत महापालिकेने लोकांची वर्दळ पाहता मुंबई-बंगळूर महामार्गावर ताथवडे येथील चौकात सेवा रस्त्याच्या दुतर्फा ११ नोव्हेंबर २०१७ रोजी तब्बल १५ लाख रुपये खर्चून लोखंडी ट्रॉलीत प्रत्येकी पाच फिरती शौचालये ठेवण्यात आली होती. शौचालयाचा वापर नागरिक करत मात्र ११ एप्रिल रोजी आरोग्य विभागाचे कर्मचारी येथील साफ सफाई गेले असता ट्रॉलीसह शौचालय गायब असल्याचे दिसले. याबाबत कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर या सर्वांनी मिळून परिसर पिंजून काढला. मात्र हाती काहीच लागले नाही. यानंतर त्यांनी पोलिसांची मदत घेतली. त्यांनीही सुरुवातीला शोधाशोध केली असून हाती काहीच लागत नसल्याने अखेर सोमवारी (दि.७) हा शौचालय चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस दफ्तरी ह्या ट्रॉलीसह शौचालयाची किंमत दीड लाख नोंदविण्यात आली आहे.