गुप्त माहितीसाठी टोल फ्री क्रमांक हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:04 AM2018-05-14T04:04:13+5:302018-05-14T04:04:13+5:30
अंतर्गत सुरक्षेमध्ये गुप्त माहिती मिळणे महत्त्वाचे असते.
पुणे : अंतर्गत सुरक्षेमध्ये गुप्त माहिती मिळणे महत्त्वाचे असते. ती मिळविण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची निर्मिती करावी. यावर मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणारी यंत्रणा निर्माण केल्यास संघटित गुन्हेगारी, दहशतवाद्यांची माहिती मिळण्यास मदत होईल,असे प्रतिपादन पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी व्यक्त केले.
सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडी (सीएएसएस) संस्थेतर्फे यशदा येथील सभागृहात ‘राष्ट्रीय सुरक्षा : संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘अंतर्गत सुरक्षा’ या विषयावर किरण बेदी बोलत होत्या.
बेदी म्हणाल्या, देशात कट्टरतावाद, जातीयवाद, दहशतवाद, ड्रग ट्राफिकिंग, संघटित गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. राज्यामध्ये राजकीय फायद्यासाठी दंगली घडविल्या जात आहेत. यामुळे देशांच्या अंतर्गत सुरक्षेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. हे धोकादायक आहे. यामुळे वेळीच या गुन्ह्यांची माहिती व्हावी, यासाठी पुद्दुचेरी येथे टोल फ्री क्रमांकाची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे गुप्त माहिती मिळविली जात आहे. देशातही अशाच प्रकारची यंत्रणा विकसित करावी.
टीसीए राघवन म्हणाले, अफगाणिस्तानच्या धोरणाकडे व्यूहरचनात्मक आणि डावपेचात्मक बघितले जाते. अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारतीय यंत्रणांचे मोठे कार्य आहे. सांस्कृतिक, आर्थिक, आरोग्यविषयक देवाणघेवाण यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक सुदृढ होत आहेत.
लेफ्टनंट जनरल सैद अता हसनैन म्हणाले, चीन झपाट्याने आर्थिक प्रगती करीत आहे. हे करत असताना दीर्घकालीन डावपेच रचून त्यांची अंमलबजावणी करीत आहे. आज सीमाप्रश्नावरून दोन्ही देशात तणाव असला, तरी भविष्यात युद्ध होणे शक्य नाही. पाकिस्तानला मदत करून भारताला दोन आघाड्यांवर लढावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण करून भारताला त्यात व्यस्त राखण्याचे धोरण चीन आखत आहे.
निवृत्त अॅडमिरल अनुप सिंग म्हणाले, चीन हिंदी महासागरात आपले वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. त्याला शह देण्याचे काम भारत करू शकतो. त्या दृष्टीने भारताने धोरणे आखायला हवी.