Pune | लोणावळा परिसरात दोनदा भरावा लागतोय टोल; अवजड वाहनचालकांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 11:14 AM2023-03-16T11:14:17+5:302023-03-16T11:15:02+5:30

एक्स्प्रेस-वेवर प्रवेश करताच या वाहनांकडून पुन्हा नव्याने टोल वसुली केली जाते...

Toll has to be paid twice in Lonavala area; Robbery of heavy vehicles | Pune | लोणावळा परिसरात दोनदा भरावा लागतोय टोल; अवजड वाहनचालकांची लूट

Pune | लोणावळा परिसरात दोनदा भरावा लागतोय टोल; अवजड वाहनचालकांची लूट

googlenewsNext

लोणावळा (पुणे) : सोमाटणे टोलनाक्याप्रमाणेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या आंतर वळणाजवळ वलवण गावाच्या हद्दीत कुसगाव टोलनाका अनधिकृतपणे उभारत वाहनांकडून दोनदा टोल वसुली केली जात आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरसोली टोलनाका येथे टोल भरल्यानंतर मुंबईकडे जाणारी अवजड वाहने ही लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर प्रवेशबंदी असल्याने वलवण येथून एक्स्प्रेस-वेवर जातात. मात्र, एक्स्प्रेस-वेवर प्रवेश करताच या वाहनांकडून पुन्हा नव्याने टोल वसुली केली जाते.

२०२०-२१ सालापर्यंत वरसोली टोलनाक्यावरील टोल भरण्याची पावती कुसगाव टोलनाक्यावर ग्राह्य धरत वाहनांना एकच टोल पावती आकारली जात होती. आता मात्र दोन वेळा टोल वसुली केली जात आहे. दरम्यान जिल्हाधिकारी पुणे यांनी लोणावळा शहरातून अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातलेली आहे; परंतु या अधिकच्या टोल वसुलीमुळे त्रस्त झालेले वाहन चालक लोणावळा शहरांमधून धोकादायक पद्धतीने वाहने घेऊन जातात. यामुळे लोणावळा शहरात अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. यात स्थानिक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी कुसगाव टोल नाक्यावर पूर्वीप्रमाणे वरसोली टोलनाक्यावरील टोलची पावती ग्राह्य धरली जावी, अन्यथा हा टोलनाका कुसगाव हद्दीमध्ये जेथे त्याचे नोटिफिकेशन झाले आहे त्या ठिकाणी हलविण्यात यावा, अशी मागणी ‘मी लोणावळाकर’ यांच्या वतीने करण्यात आली आहे.

लोणावळाकर नागरिकांनी या मागणीसाठी मागील वर्षी आंदोलन करत ‘रास्ता रोको’ केला होता. त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन देत एमएसआरडीसी व आयआरबी यांनी केवळ वेळ मारून नेली. मनशक्ती केंद्र ते खंडाळा बॅटरी हिलदरम्यान मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. या भागात कोठेही साईडपट्टी अस्तित्वात नाही. नाझर काॅर्नर खंडाळा येथील ब्लॅक स्पाॅट काढण्यासाठी वळणे काढत रस्ता सरळ करण्याचे आश्वासन एमएसआरडीसी व आयआरबीने वर्षभरापूर्वी दिले होते. प्रत्यक्षात मात्र कार्यवाही झालेली नाही. लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग मर्यादित राहावा, याकरिता पाच ठिकाणी नियमानुसार स्पीड ब्रेकर लावण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जागोजागी ब्लिंकर दिवे लावण्याचे ठरले असताना तेदेखील लावले गेलेले नाहीत.

टोल वाचविण्यासाठी वाहने शहरात; अपघातात शाळकरी मुलगी जखमी

जिल्हाधिकारी पुणे यांनी सकाळी सात ते रात्री नऊदरम्यान लोणावळा व खंडाळा शहरातून अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातलेली असताना सर्रास वाहने शहरातून जात आहेत. काल सकाळीदेखील एका कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालक व एक शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. एमएसआरडीसी व आयआरबी यांनी लोणावळाकर नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची तत्काळ पूर्तता करावी, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Web Title: Toll has to be paid twice in Lonavala area; Robbery of heavy vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.