पुणे-सोलापूर महामार्गावर टोलमुक्ती; कवडीपाट व कासुर्डी टोलनाका बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 02:21 AM2019-03-12T02:21:54+5:302019-03-12T02:22:03+5:30

१४ वर्षे केली वसुली, सेवारस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Toll redemption on Pune-Solapur highway; Tidy and casual closure of Tulnaka | पुणे-सोलापूर महामार्गावर टोलमुक्ती; कवडीपाट व कासुर्डी टोलनाका बंद

पुणे-सोलापूर महामार्गावर टोलमुक्ती; कवडीपाट व कासुर्डी टोलनाका बंद

googlenewsNext

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोलनाका रविवारी मध्यरात्री मुदत संपल्याने बंद करण्यात आला आहे.
आर्यन टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका कासुर्डी (ता. दौंड) या भागातील चौपदरी रस्त्याचे काम ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ तत्त्वावर केले. गेली १४ वर्षे टोलवसुलीचे काम नियमानुसार सुरू होते. सदर टोलवसुलीची मुदत रविवारी (दि. १० मार्च) संपली. त्यामुळे रविवारी रात्री १२ पासून येथून वाहने विनाटोल ये-जा करीत आहेत. शासनाने ठरवलेल्या नियमांप्रमाणे कंपनीने रस्त्याची दुरुस्ती केली असली, तरी प्रवाशांना शौचालय, मुख्य चौकातील दिवे, काही ठिकाणच्या सर्व्हिस रोडवर संरक्षक जाळ्या, रुग्णवाहिका आदी सोयीसुविधा देण्याबाबत आजअखेर सदर कंपनीने असमर्थता दाखवली आहे.

आयआरबी कंपनीला कवडीपाट ते यवत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २० फेब्रुवारी २००३ रोजी झालेल्या करारानुसार मिळाले होते. या २७ किलोमीटरच्या कामासाठी त्या वेळी ८८ कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले होते. रस्त्याचे काम पूर्ण करून सन २००४पासून टोलवसुलीचे काम सुरू केले आहे. १४ वर्षे टोलवसुली करण्याची परवानगी शासनाने दिली होती.

त्यानुसार कंपनी कवडीपाट, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व कासुर्डी (ता. दौंड) या दोन टोलनाक्यावर वसुली करत होती. ज्या गांभीर्याने टोलवसुली करण्यात येत होती, त्या गंभीरतेने प्रवाशांना सुविधा मात्र उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचे जाणवत होते. या महामार्गावरून दररोज हजारो लहानमोठी वाहने ये-जा करतात; परंतु महिलांसाठी एकही शौचालय दोन टोलनाक्यांदरम्यान अद्यापही उपलब्ध नाही.

२००४मध्ये हा रस्ता नवीन तयार झाला तेव्हा मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये एक लोखंडी जाळी टाकण्यात आली होती. परंतु, हळूहळू ही जाळी गायब झाली. परत जाळी टाकण्यासाठी टोल कंपनीने काहीही प्रयत्न केलेले नाहीत. मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये असणारी जाळी उभी करण्यासाठी छोटासा फुटपाथ तयार करण्यात आला. जाळीची चोरी होऊ लागली तसेच त्याखालचा फुटपाथही आपोआपच तुटला. हा तुटलेला फुटपाथ दुरुस्त करण्याची तसदी घेण्यात आलेली नव्हती.

नियमानुसार टोल कंपन्या आपल्या टोलनाक्याच्या हद्दीत एखादा अपघात झाला, तर जखमींना तातडीची मदत मिळावी म्हणून एखादी अ‍ॅम्ब्युलन्स तयार ठेवतात. या कंपनीने ठेवलेली अ‍ॅम्ब्युलन्स आजअखेर कधीच कुणी पाहिलेली नाही. या २७ किलोमीटरच्या अंतरात कंपनीने फक्त लोणी काळभोर फाटा व थेऊर फाटा या दोनच ठिकाणी दिवे स्वत: बसविले आहेत.

इतर ठिकाणी खासगी व्यक्ती, औद्योगिक कंपन्या, शैक्षणिक संस्था यांनी मोठे-मोठे दिवे बसवून दिले आहेत. ‘टोल कंपनीने स्वत: बसविलेले सर्व दिवे चालू दाखवा व एक लाख रुपये बक्षीस मिळवा’ असे बक्षीस जाहीर केले, तरी कुणालाच ते बक्षीस मिळणार नाही, याची प्रचंड खात्री व आत्मविश्वास टोल कंपनीला होता. त्यामुळे सदरचे दिवे चालू करण्याची तसदीही टोल कंपनीने कधीच घेतली नाही. प्रवाशांच्या नशिबाने दिवे चालू झाले तर ठीक, नाही तर तक्रारीची अजिबात दखल घेतली जात नव्हती.

पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी खड्डे पडत आहेत. याकडेही लक्ष देण्यास टोल वसूल करणाऱ्या कंपनीला अजिबात वेळ नव्हता. टोलवसुली करणारी कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग व परिसरातील राजकीय नेतेमंडळी यांपैकी कुणालाच रस्त्याच्या संदर्भात जनतेची काळजी घ्यावी, असे वाटले नाही.

या टोल कंपनीच्या आधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी झोपले होते.
सदर महामार्गाचा ताबा कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला. तत्पूर्वी, कंपनीने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावरील चोरीस गेलेल्या जाळ्या पुन्हा बसवल्या आहेत.
परंतु, त्याच्या गुणवत्तेबाबत सर्व जण साशंक आहेत. रस्तादुभाजकाची उंची काही ठिकाणी वाढवली आहे. महामार्गालगत असलेल्या साईडपट्ट्यांमध्ये मुरूम भरला असला, तरी तो पाणी टाकून व्यवस्थित बसला नसल्याने जाड मुरमाने आपले डोके वर काढले असून दुचाकीस्वारांना तो नसून अडचण, असून अडथळा ठरत आहे.

Web Title: Toll redemption on Pune-Solapur highway; Tidy and casual closure of Tulnaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.