शिवशाही बसच्या पाठीमागचे अपघाताचे शुक्लकाष्ट संपेना; दैव बलवत्तर म्हणून १२ प्रवासी बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 06:48 PM2020-08-24T18:48:08+5:302020-08-24T19:17:33+5:30
पुणे-नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत रात्री शिवशाही बस झाली पलटी
मंचर: पुणे-नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत रात्री शिवशाही बस पलटी झाली.सुदैवाने या अपघातातून 12 प्रवासी बालंबाल बचावले असून काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती यानिमित्ताने आली .बसमधील दोन प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे.अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
लॉकडाउननंतर शासनाने एसटी सेवा हळूहळू सुरू केली असून नुकतीच शिवशाही बस सेवा सुरू झाली आहे. शिवशाही बसचे यापूर्वी अनेक वेळा अपघात झाले आहेत. मात्र एसटी सेवा सुरु झाल्यानंतरचा हा पहिला अपघात कळंब गावच्या हद्दीत झाला .सुदैवाने यात प्रवासी बालंबाल बचावले आहेत.
पुणे - नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत रात्री साडेआठ वाजता नाशिक ते पुणे शिवशाही बस पलटी झाली. शिवशाही बस क्रमांक ( एम.एच.०६ बी.डब्लू. ०६४१) नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जात होती. कळंब गावच्या हद्दीत समोरून अचानक येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस रस्ता उतरून डाव्या बाजूला रस्त्यावर पलटी झाली. बसमध्ये १२ प्रवासी होते. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
उद्योजक नितीन भालेराव व अन्य ग्रामस्थ मदतीसाठी धावले. उपस्थित ग्रामस्थांनी प्रवाशांना बाहेर काढले. महेश थोरात यांनी तात्काळ आपला जेसीबी आणून जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस रस्त्यातून बाजुला काढली. त्यानंतर वाहतुक पुर्ववत सुरू झाली. बारा प्रवाशांपैकी दोन प्रवाशांना किरकोळ मार लागला होता. उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उर्वरित प्रवाशांना थोडासा मार लागल्याने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर पुणे-नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली. शिवशाही बस पलटी झाल्यानंतर प्रवाशाला अथवा चालकाला गंभीर दुखापत झाली नसल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय आला आहे.