टोलवसुली करता; मग रस्ते दुरुस्ती कधी?
By admin | Published: March 21, 2017 05:01 AM2017-03-21T05:01:52+5:302017-03-21T05:01:52+5:30
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ या रस्त्यावर नुकताच मिनीबस व मालवाहू ट्रक यांचा उरुळी कांचनजवळ भीषण अपघात
उरुळी कांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ या रस्त्यावर नुकताच मिनीबस व मालवाहू ट्रक यांचा उरुळी कांचनजवळ भीषण अपघात होऊन त्यात ११ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर या दुरवस्थेची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. जेथे अपघात झाला त्याठिकाणी सातत्याने अपघात होऊन अनेकांना मरणयातना भोगाव्या लागतात.
पण त्या ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा असा फलक व धोक्याची सूचना देणारा रेड लाईट सिग्नल बसविणे गरजेचे असताना कोणताही अधिकारी याबाबत कर्तव्यतत्परता दाखवत नाही हीच खरी शोकांतिका आहे. संबंधितांनी त्वरित लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नूतन जिल्हा परिषद सदस्या कीर्ती अमित कांचन यांनी केली आहे. आणखी किती लोकांचे बळी या कंपनीला व शासनाच्या अधिकाऱ्यांना अपेक्षित आहेत, असा सवाल या भागातील जनता विचारू लागली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट (ता. हवेली) ते कासुर्डी फाटा (ता. दौंड) या भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी खचलेल्या साईडपट्ट्या अपघाताला कारणीभूत ठरून अनेकांना आपले प्राण गमाविण्याची वेळ आली. तरीही त्याकडे महामार्ग व्यवस्थापन व आयआरबी ही रस्ता बांधणी करणारी खाजगी कंपनी संगनमताने दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप मावळते जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे यांनी केला आहे.
महामार्ग व सेवामार्ग यांच्यामधील सुरक्षा म्हणून उभारण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या बऱ्याच ठिकाणी नाहीशा झाल्या आहेत. महामार्गाच्या दुभाजकावर बसविण्यात आलेल्या प्रकाशनियंत्रकांचे वेगवेगळ्या अपघातांमध्ये झालेल्या तुटफुटीची दुरुस्ती न करण्याने रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रकाशझोताने वाहनचालकांना त्रास होतो. पुणे-सोलापूर महामार्गाची टोलवसुली पट्ट्यात कमालीची दुरवस्था झाली असून, टोलवसुली कंपनीचे दुर्लक्षच यामुळेच अशी अवस्था या रस्त्याची झाली असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.