"लसीकरण आणि वैद्यकीय सुविधांबाबत राज्यात टोलवाटोलवीची उत्तरे, आघाडी सरकारचा नुसताच केंद्रावर आरोप"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 02:43 PM2021-06-13T14:43:02+5:302021-06-13T14:46:28+5:30
पँडॅमिक मध्ये राज्य सरकारची भरीव अशी काय कामगिरी? भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा सवाल
पाषाण: कोरोना कालावधीमध्ये आरोग्याबरोबरच व्यवहाराचाही आर्थिक फटका सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. राज्य सरकारकडून वैद्यकीय सुविधा आणि लसीकरण प्रश्न विचारले असता टोलवटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. केंद्राने मदत करूनही आघाडी सरकारकडून नुसता आरोप - प्रत्यारोपांचा खेळ चालू आहे. पँडॅमिक मध्ये राज्य सरकारने भरीव अशी काय कामगिरी केली. असा सवाल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
तर ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शाळांनी किती फी आकारावी याबाबत सरकारचे धोरण नाही. यामुळे शाळा विद्यार्थ्यांच्या निकालांमध्ये अडवणूक करून पालकांची लुट करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. बाणेर बालेवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला कोवीड योद्ध्यांचा सन्मान तसेच महिला सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
"कोरोना मध्ये आरोग्याबरोबरच आर्थिक फटका देखील मोठ्या प्रमाणामध्ये बसला आहे. सरकार पॅकेज जाहीर करत आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये रिक्षाचालक घरगुती कामगार महिला यांना मदत झालेली नाही. २०१४ नंतर घरकाम करणाऱ्या कामगारांची नोंदणी झालेली नाही. तसेच जाहीर केलेले पॅकेज किती जणांपर्यंत पोहोचले याचे उत्तरे सरकार देत नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
राज्य सरकारने धोरण ठरवणे आवश्यक होते
शाळेची फी हा कळीचा मुद्दा आहे. शालेय शिक्षण ऑनलाईन असताना शाळांनी किती फी आकारावी याबाबत राज्य सरकारने धोरण ठरवणे आवश्यक होते. हे देखील त्यांनी ठरवले नाही. शाळांमध्ये फी भरली न भरल्याने रिझल्ट दिले जात नाहीत. शाळांच्या मनमानी कारभाराचा विरोधात सरकारने पाऊल उचलणे गरजेचे आहे.
वीजबिल संदर्भात सरकारमधील मंत्री गप्पच
पँडॅमिक मध्ये राज्य सरकारने भरीव अशी काय कामगिरी केली. तर हे सरकारला सांगता येणार नाही. डोमेस्टिक व्हायोलन्स मध्ये वाढ झाली आहे, तसेच पोलिस दलातील महिला देखील सुरक्षित नाहीत. कोवीड मुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या जनतेला वाढीव वीज बिलामुळे आणखीनच अडचणींचा सामना करावा लागत आहे. विजबिला संदर्भामध्ये सरकारमधील मंत्री देखील काहीच बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक अमोल बालवडकर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.