टोमॅटो पिकालाही विषाणूची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:25+5:302021-05-29T04:09:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: शेतातल्या टोमॅटो पिकालाही विषाणूजन्य आजार झाल्याचे दिसत आहे. जून्नर तालुक्यात याचे प्रमाण जास्त असून लागवड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: शेतातल्या टोमॅटो पिकालाही विषाणूजन्य आजार झाल्याचे दिसत आहे. जून्नर तालुक्यात याचे प्रमाण जास्त असून लागवड करण्यापूर्वीच रोपांची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
टोमॅटो बारमाही पिक आहे. जिल्ह्यात काही हजार हेक्टरवर टोमॅटो घेतला जातो. रोप तयार करण्याला महिना व लागवडीनंतर पाच महिने अशा ६ महिन्यांच्या कालावधीत टोमॅटो हाती येतो.
उन्हाळी हंगामात टोमॅटोची लागवड कमी होते, पण जुन्नर व आणखी काही तालुक्यात टोमॅटोची लागवड झाली आहे. शेतातल्या तीन चार महिन्यांच्या टोमॅटोवर कीड पडण्यास सुरुवात झाली आहे. हा विषाणूजन्य आजार असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राने त्यापासून वाचण्यासाठी रोपांचीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्याची पद्धतही त्यांनी जाहीर केली आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले की, बियाणे टीएसपीच्या द्रावणात बुडवून नंतरच लावावे. रोपवाटिकेत रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी रोपांवर जाळी वगैरे टाकून घ्यावी. टोमॅटोसाठी रोपे तयार करण्यापूर्वी तसेच लागवड करताना, लागवड झाल्यावर काय काळजी घ्यावी, या माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने केले आहे.