टोमॅटोचे भाव घसरले, शेतकऱ्यांना रडवले; किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:27 IST2025-01-25T12:27:11+5:302025-01-25T12:27:35+5:30
घाऊक बाजारात टाेमॅटो विक्रीस पाठविणेही शेतकऱ्यांना परवडत नसल्याने सध्या लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगतायेत

टोमॅटोचे भाव घसरले, शेतकऱ्यांना रडवले; किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलो
पुणे: राज्यातील सर्वच बाजार समितींच्या आवारात टोमॅटोंची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. परिणामी पुणे येथील मार्केटयार्ड फळबाजारातही फटका बसला आहे. पुणे घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार चार ते पाच रुपये किलो, तर किरकोळ बाजारात एक किलोला १५ ते २० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी बळीराजा हवालदिल झाला आहे. घाऊक बाजारात टाेमॅटो विक्रीस पाठविणेही शेतकऱ्यांना परवडत नसल्याने सध्या लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी नाराज झाले आहेत.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर शंभर रुपयांपर्यंत गेले होते. पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली होती. टोमॅटोला भाव मिळाल्याने पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, सोलापूरसह राज्यातील सर्व विभागांतील शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. लागवड चांगली झाल्याने गेल्या महिनाभरापासून राज्यातील सर्व बाजार समितींच्या आवारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीस पाठविला. मात्र टोमॅटोची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे.
असे आहेत सध्याचे टोमॅटोचे दर
- मार्केट यार्ड घाऊक बाजार (१० किलो) ४० ते ५० रुपये
-किरकोळ बाजार (एक किलो) १५ ते २० रुपये
‘टोमॅटो फेकून देण्याशिवाय पर्याय नाही’
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात टोमॅटोला भाव चांगले मिळाले होते. सध्या घाऊक बाजारात ४ ते ५ रुपये किलो भाव मिळत असल्याने टोमॅटो फेकून देण्याशिवाय पर्याय उरला नाही. टोमॅटोची तोडणी आणि वाहतूक खर्च परवडत नाही. एका प्लास्टिकच्या जाळीत (क्रेट) २० ते २२ किलो टोमॅटो बसतात. घाऊक बाजारात एका क्रेटला ७० ते ८० रुपये दर मिळत आहेत.
बाजारपेठेत टोमॅटोची बेसुमार आवक होत असल्याने भावात मोठी घट झाली आहे. लागवड केलेल्या टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. घाऊक बाजारात ४ ते ५ रुपये किलो भाव मिळत आहे. - विलास भुजबळ, ज्येष्ठ अडते