२० किलोच्या क्रेटला मिळतोय फक्त ४० ते ५० रुपये भाव, टोमॅटो उत्पादक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 02:47 AM2018-05-07T02:47:29+5:302018-05-07T02:47:29+5:30
जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसर पूर्व व पश्चिम पट्ट्यातील टोमॅटो उत्पादक टोमॅटोला योग्य उत्पादन खर्च मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक हवालदिल झाला आहे.
ओतूर - जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसर पूर्व व पश्चिम पट्ट्यातील टोमॅटो उत्पादक टोमॅटोला योग्य उत्पादन खर्च मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक हवालदिल झाला आहे.
टोमॅटो उत्पादनासाठी शेतकरी लागवड पूर्वमशागत, लागवड, मल्चिंग पेपर, बांधणीसाठी बांबू आदी कामासाठी विविध प्रकारच्या फवारणीनंतरतोडणीसाठी लाखो रुपये खर्च करतात.
जुन्नर तालुक्यात नारायणगाव येथे टोमॅटो मार्केट आहे. सध्या या मार्केटमध्ये टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला फक्त ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळतो. या भावाने लागवडीपासून टोमॅटो मार्केटमध्ये आणण्यासाठीचा वाहतूक खर्च, तोडणी मजुरी उत्पादनासाठी जो एकूण खर्च झाला, तोही विक्रीतून मिळत नाही. फायदा नाही उलट तोटा जास्तच होतो, हे लक्षात आल्याने दुसरे पीक घेण्यासाठी टोमॅटोच्या फळांनी बहरलेल्या बागा टोमॅटोसह उपटून टाकीत आहेत. काही शेतकरी मेंढपाळांना बोलावून टोमॅटो उपटून नेण्यासाठी सांगत आहेत. त्यामुळे ऐनउन्हाळ्यात मेंढ्यांना हिरवा चारा उपलब्ध होत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतकऱ्यांना अच्छे दिन आणावेत.
ओतूर परिसर उदापूर, डिंगोरे, कोळवाडी, पिंपळगाव जोगे व ओतूरच्या पूर्वेकडील खामुंडी, उंब्रज, डुंबरवाडी, गायमुखवाडी, उत्तरेकडील रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, पूर्वेकडील पिंपरीपेंढार या विभागात टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात नगदी पीक म्हणून घेतले जाते. जिवापाड मेहनत करून शेतकरी कांदा, कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला पिकवितो, परंतु कोणत्याही शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे तो कर्जबाजारी होत आहे.
टोमॅटोच्या संरक्षणासाठी मल्चिंग पेपरचा वापर
पिंपरी पेंढार : उष्णतेपासून टोमॅटोपिकांचे संरक्षण करण्यासाठी खामुंडी (ता. जुन्नर) येथील प्रगतिशील शेतकरी समीर दत्तात्रय बोडके यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात मल्चिंग पेपर (कागद) पसरून टोमॅटो लागवड केली आहे.
बदलते हवामान आणि तीव्र उन्हाळा यापासून पिकांची शेतकरीवर्ग मोठ्या कष्टाने काळजी घेत आहेत. उन्हामुळे सर्वच पिकांना फटका बसत असल्याने जवळपास सर्वच शेतकरी सध्या मल्चिंग पेपरचा वापर करीत आहेत. वाढत्या तापमानामुळे शेतकºयांना पिके घेणे खूपच कठीण झाले. त्याला पर्याय म्हणून साध्य शेतकरी मल्चिंग पेपर टाकून आपल्या पिकांचे संरक्षण करतात.