टोमॅटो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर : दर ६० रुपये किलो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 11:07 AM2019-07-25T11:07:29+5:302019-07-25T11:20:30+5:30
आठ दिवसांपूर्वी २५-३० रुपये किलो मिळणारा टोमॅटो आता तब्बल ६० रुपये किलो पर्यंत जाऊन पोहचला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे
पुणे : संपूर्ण राज्यात एप्रिल-मे महिन्यांत पडलेला कडक दुष्काळ आणि त्यानंतर काही ठराविक भागांमध्ये झालेली अतिवृष्टीचा मोठा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये येणारी टोमॅटोची आवक तब्बल निम्याने कमी झाली असून, मागणी कायम असल्याने दरामध्ये मोठी वाढ झाली आहे.
आठ दिवसांपूर्वी २५-३० रुपये किलो मिळणारा टोमॅटो आता तब्बल ६० रुपये किलो पर्यंत जाऊन पोहचला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील एक-दीड महिना अशीच परिस्थिती राहिली असे भाजीपाला व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. एप्रिल-मे महिन्यात पडलेल्या कडक दुष्काळामुळे पावसापूर्व होणाऱ्यांच्या टोमॅटोची लागवड झाली नाही. त्यानंतर जून महिन्यात देखील पावसाने ओढ दिली याचा नवीन लागवडीवर मोठा परिणाम झाला. तर पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी थेंब-थेंब पाणी घालून जगवलेला टोमॅटोची बाग जुलै महिन्याच्या सुरुवातील झालेल्या धुवांधार पावसाचा देखील मोठा फटका बसला. त्यात कीड आणि बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवाती पासूनच ढगाळ वातावरण व अधून-मधून येणारा पाऊस याचा टोमॅटो पिकावर चांगलाच परिणाम झाला. टोमॅटोच्या लालकोळी, फळावर काळे ठिपके, चिरटा या कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे झाडांची वाढ खुंटली असून पाने पिवळी पडली असून टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून पुण्याच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील तरकरी विभागात सरासरी केवळ तीन ते साडेतीन हजार क्रेटस आवक होत आहे. हीच आवक नेहमी सरासरी आठ हजार क्रेटस्पर्यंत होती. त्यातही येणाऱ्या माल पावसामुळे खराब व किडका असल्याने सध्या केवळ २५ ते ३५ टक्केच आवक होत आहे. परंतु मागणी कायम असल्याने दरामध्ये प्रचंड वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.--
पावसाचा मोठा फटकादुष्काळामुळे एप्रिल-मे महिन्यात कमी प्रमाणात टोमॅटोची लागवड झाली. शेतकऱ्यांनी वाढविलेल्या व हाताशी आलेला टोमॅटोच्या बागांना अति पावसामुळे मोठा फटका बसला आहे. यामुळे जून महिन्यात एक एकरमध्ये ९० ते १०० क्रेटस माल निघत असताना आता केवळ १५ ते २० केर्टस्पर्यंत खाली आले आहे. यामध्ये निघालेल्या मालाचा दर्जा देखील कमी आहे.शेतकऱ्यांच्या शेतातच माल नसल्याने दर वाढले आहेत.
नवनाथ शेळके, टोमॅटो शेतकरी, धनगरवाडी, जुन्नर .....................