बाजारभावाअभावी टोमॅटो मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:28+5:302021-08-27T04:15:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेलपिंपळगाव : बाजारात टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मालाचे उत्पादन निघूनही आर्थिक तोटा सहन करावा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : बाजारात टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मालाचे उत्पादन निघूनही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी पिकाची तोडणी लांबणीवर जात असून बागातच टोमॅटो खराब होऊ लागली आहेत. एकीकडे वातावरणाच्या विपरीत परिस्थितीत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने फळांच्या बागा यशस्वी केल्या आहेत. परंतु पीक तोडणीच्या काळातच बाजारात पिकाचे भाव आपटल्याने शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा येत आहे.
खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांशी शेती चासकमान व भामा आसखेड धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. विशेषतः खरीप हंगामात टाॅमॅटोची लागवड केली जाते. चालू वर्षी मान्सून पावसाने ओढ दिल्याने उपलब्ध पाणीसाठ्यावर शेतकऱ्यांनी लागवडी पूर्ण केल्या आहेत. कठोर मेहनतीने पिकवलेल्या बागा फळांनी लगडून आल्या आहेत. मात्र, तोडणीच्या काळातच बाजारात टोमॅटोचे दर नीच्चांकी पातळीवर आले आहेत.
सध्या टोमॅटोला प्रतीनुसार १० किलोला २५ ते ३० रुपये असा कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने उत्पादित पिकावरील भांडवल खर्चही उत्पादकांच्या हाती येत नसल्याची सत्यस्थिती आहे. सध्या एका केरेटला अवघे ५० ते ६० रुपये उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात येत असल्याने शेतकरी चिंतावला आहे. अनेक ठिकाणी टोमॅटो तोडून बागेबाहेर फेकण्याची वेळ उद्भवली आहे.
कोट
“ विपरीत परिस्थितीत टोमॅटो पिकाची लागवड करून चांगली बाग तयार केली आहे. एकरी उत्पादनही निघत आहे. परंतु बाजारात टोमॅटोचे दर कोसळल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. पिकाला दहा ते बारा रुपये किलोप्रमाणे दर प्राप्त झाला असता तर एकरी उत्पन्न लाखोंच्या घरात प्राप्त झाले असते.
- शिवाजी म्हस्के, उत्पादक शेतकरी, साबळेवाडी
फोटो ओळ : टोमॅटोला चांगला दर नसल्याने परिपक्व पीक तोडणीवाचून वाया जात आहे. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)