Pune Ganpati: निरोप घेतो बाप्पा आता आज्ञा असावी! उद्या आकर्षक रथामधून श्रींची वैभवशाली मिरवणूक निघणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 03:14 PM2024-09-16T15:14:59+5:302024-09-16T15:15:33+5:30
विसर्जन मिरवणुकीसाठी विविध मंडळांचे खास रथ सजविण्याचे काम सुरू झाले असून ढोल-ताशा, शंखनाद पथकेही सज्ज
पुणे : गेल्या दहा दिवसांपासून शहरामध्ये मंगलमय, चैतन्यदायी वातावरणात गणेशोत्सव सुरू आहे. आता मोठ्या जड अंत:करणाने श्री गणरायाला निरोप देण्याची वेळ समीप आली आहे. उद्या (दि.१७) मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन होईल. विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने काढण्यासाठी सर्व मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी विविध मंडळांचे खास रथ सजविण्याचे काम सुरू झाले आहे. ढोल-ताशा पथके, शंखनाद पथकेही सज्ज झाले आहे.
शहरामध्ये श्री गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सर्वत्र उत्साहाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. या मंगलमूर्तीच्या आनंदोत्सवात सर्वजण सहभागी झाले होते. सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी तर हा उत्सव मोठ्या मानाचा असतो. प्रत्येक कार्यकर्ता त्यासाठी झटत असतो. मंडळांनी यंदा तयार केलेले देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. शनिवार आणि रविवारी श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दीचा उच्चांक गाठला. मात्र आता गणरायाच्या निरोप देण्याची तयारी सुरू झाली आहे.
मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी खास नियोजन केले आहे. मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी (दि.१७) सकाळी सुरुवात होईल. यंदा मिरवणूक वेळेत संपवण्याचा प्रयत्न सर्व मंडळे करणार आहेत. परंतु, मंडळासमोर ढोल-ताशा पथकांच्या संख्येला मर्यादा नसल्याने मिरवणूक लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गणरायाच्या निरोपासाठी मंडळांनी अतिशय सुंदर देखावे असलेले रथ तयार केले आहेत. त्यात विराजमान होऊन गणराय त्यांच्या गावाला जाणार आहेत.
मानाचा पहिला : ग्रामदैवत श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळ
ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची मंगळवारी सकाळी १०:३० वाजता मंडईतील टिळक पुतळ्यासमोर पूजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होईल. बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक टिळक चौकात संपेल. त्यानंतर गणरायाचे विसर्जन होईल. सुरुवातीला गणरायासमोर नगारखाना, रमणबाग पथक, कामयानी संस्थेचे पथक, परशुराम पथक, रूद्र गर्जना, प्रभात बँड आपली सेवा सादर करतील. पालखीमध्ये विराजनमान होऊन गणरायाची दिमाखात मिरवणूक निघणार आहे, अशी माहिती मंडळाचे श्रीकांत शेटे यांनी दिली.
मानाचा दुसरा : श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सकाळी ९ वाजता जोगेश्वरी चौकातील मांडवातून गणरायाची मूर्ती पालखीत विराजमान होईल. सकाळी १०:३० वाजता टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होईल. मिरवणुकीत सतीश आढाव यांचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड यंदा पुण्यात प्रथमच बँडवर ‘शिवतंडब’ वाजवणार आहेत. समर्थ प्रतिष्ठानतर्फे ‘भगवाधारी - ताल रूपात अयोध्यापती अवतरणार आहेत. तर शिवमुद्रा ढोल-ताशा पथक मल्हारी मार्तंड- खंडोबाचा जागर करतील. ताल ढोल-ताशा पथक कारगिल युद्धाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इंडियन आर्मीला मानवंदना देतील. ‘विष्णूनाद’चे कार्यकर्ते पालखी पुढे शंख नाद करतील. अब्दागिरी, मानचिन्हांसह श्री गणराय विराजमान असलेली चांदीची पालखी कार्यकर्ते स्वतः खांद्यावरून वाहून मिरवणुकीमध्ये सहभागी होतील.
मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालीम गणपती मंडळ
विसर्जन मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, गर्जना ढोलताशा पथके असतील. आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पॉवरलिफ्टिंग खेळात अनेक पदके मिळवून देणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंचा यावेळी समावेश असेल. नादब्रह्माचे सर्व वादक ढोलताशाची सेवा देतील. अतुल बेहरे यांचे नादब्रह्म ढोलताशा पथक व त्यांच्यासोबत तृतीयपंथियांचे शिखंडी पथक असेल. स्वप्निल सरपाले व सुभाष सरपाले यांनी बनविलेल्या फुलांच्या आकर्षक 'सूर्य' रथातून श्रींची वैभव शाली विसर्जन मिरवणूक सुरू होईल. मिरवणूक सकाळी १०:३० वाजता लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते आरती होऊन प्रारंभ होईल.
मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग गणपती मंडळ
यंदा श्री तुळशीबाग गणरायाची श्री जगन्नाथ रथातून वैभवशाली विसर्जन मिरवणूक होणार आहे. रथ ३२ फुट उंच असून आकर्षक फुलांनी सजवलेला आहे. लकडी पुलावरील मेट्रो ब्रीजमुळे उंचीला मर्यादा असल्याने हायड्रॉलिकचा वापर करण्यात येणार आहे. पुष्प सजावटकार सरपाले बंधूंनी रथाची सजावट केली आहे. रथावर श्री जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा या देवता असणार आहेत तसेच जगन्नाथ रथाप्रमाणे कार्यकर्ते रथ ओढणार आहेत. त्यात शिवमुद्राचा गाजत असलेला श्री जगन्नाथचा ठेका असणार आहे. अग्रभागी लोणकर बंधूंचा नगारा वादन, स्वरूप वर्धनी, गजलक्ष्मी वाद्य पथके सहभागी होणार आहेत. स्वरूपवर्धिनीची मल्लखांबची प्रात्यक्षिक विशेष आकर्षण असणार आहे, अशी माहिती मंडळाचे नितीन पंडित यांनी दिली.
मानाचा पाचवा गणपती - केसरीवाडा गणपती मंडळ
महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. परंपरेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीत गणराय विराजमान असणार आहेत. मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा, आवर्तन ढोल-ताशा पथक तसेच बिडवे बंधुचा सनई-चौघडा असणार आहे. इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे हे लोकमान्यांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी होतील. विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला माऊली रथ मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे. विसर्जन मिरवणुकीत ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, विश्वस्त-सरव्यवस्थापक व उत्सव प्रमुख डॉ. रोहित टिळक, विश्वस्त-व्यवस्थापिका व उत्सवाच्या संयोजिका डॉ. गीताली टिळक, ‘केसरी’च्या विश्वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक, रौनक रोहित टिळक यांच्यासह ‘केसरी’चे अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळातर्फे सकाळी ७:३० वाजता अनंत चतुर्दशीची पूजा आचार्य परम पूज्य स्वामी गोविंद गिरी महाराज (कोषाध्यक्ष राम जन्मभूमी, आयोध्या) यांच्या हस्ते होईल. त्यानंतर सकाळी ८:३० वाजता रथातून गणरायाचे प्रस्थान विसर्जन मिरवणुकीसाठी होईल. मिरवणूक मार्ग- वरद विघ्नेश्वर वाडा- बुधवार चौक - समाधान चौक - टिळक पुतळा मंडई येथून सायंकाळी ८ वा. टिळक पुतळा येथून मिरवणुकीत प्रस्थान होईल. हा मार्ग- टिळक पुतळा मंडई- समाधान चौक- लक्ष्मी रोड- अलका चौक असा असणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
श्री उमांगमलज रथातून निघणार 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक निघेल. यंदा मंडळ दुपारी ४ वाजता मिरवणुकीत सहभागी होईल. यंदा श्री उमांगमलज रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युत रोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली. श्री उमांगमलज रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती असणार आहे. त्याच्या बाजूला त्रिशूल आणि डमरूदेखील आहे. कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखविला आहे. नागाच्या फण्यावर हा तोललेला आहे, बाजूला २१ छोटे कळस लावण्यात आले आहेत. तर रथावर २३ नंदींचे चेहरे बसविले आहेत. तसेच रथावर तब्बल १८ क्रिस्टलचे झुंबर लावण्यात येतील. रथावर ८ खांब साकारले आहेत. प्रत्येक खांबांवर बेलाच्या पानांचे डिझाइन साकारले आहे. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर एलईडी व पार लाइटचे फोकस लावण्यात येणार आहेत. रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. तेथे मोराची डिझाइन आहे. युवा कलादिग्दर्शक विराज खटावकर यांनी हा रथ साकारला आहे. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असेल.
अखिल मंडई गणपती मंडळ : आदिशक्ती’ रथातून मिरवणूक
अखिल मंडई मंडळाची विसर्जन मिरवणूक ‘आदिशक्ती’रथातून निघणार आहे. रौद्र रूपातील कालीमातेची १५ फूट उंचीची मूर्ती यामध्ये असेल. दरवर्षी मिरवणुकीत श्री शारदा गजाननाचे फक्त समोरूनच दर्शन घेता येते. त्यामुळे यंदा प्रथमच शारदा गणपतीची मूर्ती ६० अंशांत फिरणार असून, दोन्ही बाजूने भाविकांना दर्शन घेता येणार आहे. रथाची उंची कमी करण्यासाठी हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दि.१७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता निघणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली. रथाची रुंदी १४ बाय १८ असून उंची २७ फूट आहे. मेट्रोच्या लकडीपूल येथील पुलामुळे हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरले आहे. कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर आणि सहकाऱ्यांनी रथ साकारला आहे. आदिशक्ती रथावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. शिवगर्जना आणि शिवमुद्रा वाद्य पथकाचे वादन करतील.