उद्या मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार, शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 11:01 AM2018-07-26T11:01:08+5:302018-07-26T11:01:21+5:30
येत्या पौर्णिमेला म्हणजेच २७ जुलै रोजी रात्री या शतकातील ( २००१ ते २१०० ) सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पहायला मिळणार आहे.
पुणे : येत्या पौर्णिमेला म्हणजेच २७ जुलै रोजी रात्री या शतकातील ( २००१ ते २१०० ) सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पहायला मिळणार आहे. सध्या आपल्याकडे पावसाळी व ढगाळ वातावरण असल्याने आपण या संधीला मुकतो की काय असे वाटत आहे. या वेळेस होणाºया ग्रहणाचा कालावधी सुमारे चार तास ( ३ तास ५५ मिनिटे ) असल्याने हे सर्वात मोठ्या कालावधीचे ठरणार आहे व याच दिवशी सूर्यमालेतील क्रमांक चारचा तांबडा ग्रह मंगळ ही प्रतियुती मध्ये येत असून तो २००३ नंतर प्रथमच इतक्या कमी अंतरावर येत आहे.
याबाबत भौतिकशास्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की, २७ जुलै रोजी सूर्य - पृथ्वी - चंद्र व मंगळ ग्रह हे सर्व एकच रेषेत येत आहेत. या वेळेस खग्रास स्थितीतील तांबडा चंद्रव तेजस्वी तांबडा ग्रह मंगळ हे दोन्हीही आकाशात लक्ष वेधून घेणार आहेत.
२७ जुलै २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण हे सोरास चक्रातील १२९ वे ग्रहण आहे. या आधीचे सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते. योगायोग म्हणजे दोन्हीही ग्रहणे एकाच सारोस चक्रातील आहेत. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडातून ( युरोप, आफ्रिका, आशिया, आॅस्ट्रेलिया & न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका ) हे ग्रहण पहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतातून यावेळी ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहायला मिळणार आहे.
या वेळेस भारतीय प्रमाण वेळ २७ जुलै रोजी २३़ ५४ वाजता चंद्र पृथ्वीच्या पश्चिमेकडील बाजूने विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे़ खग्रास स्थिती वेळ २८ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता सुरु होणार आहे. ग्रहण मध्य २८ जुलै रोजी १वाजून ५२ मिनिटांनी होणार आहे, तर पहाटे २:४३ वाजता ग्रहणाची खग्रास स्थिती संपेल व चंद्र विरळ छायेतून दिसायला सुरुवात होईल व ३:४९ वाजता ग्रहण समाप्ती होणार आहे.
या खग्रास चंग्रहणाच्या सर्व स्थिती ( स्पर्श, संमिलन, उन्मीलन व मोक्ष ) ह्या भारतातील सर्व ठिकाणातून दिसणार आहे, केवळ पावसाळ्याचे दिवस असल्याने ढगाळ वातावरण असेल तर या मोठ्या खगोलीय घटनेला मुकावे लागू शकते़
चंद्र पृथ्वी भोवती फिरतांना दीर्घ वतुर्ळाकार कक्षेत फेरी मारतो. वर्षभरातील दुरस्त अंतर हे जुलै महिन्यात असते़ तसेच जुलै महिन्यातील दुरस्त अंतरही दिनांक २७ जुलै रोजीच आले आहे. चंद्र आकाशात आकाराने वर्षातील सर्वात लहान आकारात दिसणार असून ग्रहण काळात पृथ्वीच्या दाट छायेतून प्रवास करतांना जास्त वेळ घेणार आहे. यामुळेच हे खग्रास चंद्रग्रहण सर्वाधिक कालावधीचे असणार आहे.
२७ जुलै रोजी दुपारी ०१:२० वाजता सूर्यमालेतील चौथा गृह मंगळ सूर्याशी प्रतीयुतीमध्ये येत आहे. या दिवशी सायंकाळी सूर्य पश्चिम आकाशात मावळला की पूर्व आकाशात पौर्णिमेचा चंद्र व त्या जवळच तेजस्वी तांबडा मंगळ ग्रह दिसणार आहे. या वेळेस पृथ्वी मंगळ अंतर हे ५.७६ कोटी किमी असणार आहे
सन २००३ च्या २७ आॅगस्ट रोजी हाच मंगळ आपल्या ६० हजार वर्षातील सर्वात कमी अंतरावर म्हणजेच ५.५६ कोटी किमी अंतरावर होता. या वेळेस आकाश निरभ्र असल्यास दुर्बिणीतून निरीक्षण केले असता मंगळ ग्रहाच्या उत्तर ध्रुवावरील असलेला बर्फाच्छादित प्रदेश पाहायला मिळू शकतो, असे जोहरे यांनी सांगितले़