Kasba | कसब्याच्या विजयानंतर महाविकास आघाडीला 'टॉनिक', भाजपला करावे लागणार ‘चिंतन’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 11:26 AM2023-03-03T11:26:15+5:302023-03-03T11:27:13+5:30
आजारी असतानाही बापट यांना प्रचारात उतरविल्याचे मतदारांना खटकले...
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला. त्यामुळे महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे मनोधर्य वाढले आहे. महापालिकेत पाच वर्षे एकहाती सत्ता आणि खासदार, पाच आमदार, असा मोठा फौजफाटा असतानाही बालेकिल्ल्यात कॉंग्रेसने विजयाची मुसंडी मारल्यामुळे भाजपला चिंतन करावे लागणार आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० स्टार प्रचारक उतरविले होते. मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवस पुण्यात ठाण मांडून बसले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस हे दहा वेळा पुण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळ ठोकल्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त झाला. महाविकास आघाडीचे रवीद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठीही कॉंग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट यांच्या नेत्यांनी सभा, रॅली, पदयात्रेद्वारे जाेरदार प्रचार केला. त्यात धंगेकर यांची लोकप्रियताही महत्त्वाची बाब ठरली आहे. कसब्यातील गणेशोत्सव मंडळे आणि स्थानिक संस्था- संघटनांशी धंगेकरांचा उत्तम ‘कनेक्ट’ असल्याचा फायदा धंगेकर यांना झाला. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकजुटीने लढवली. पुणेरी पाट्यांचा वापर, प्रचाराची व्यूहरचना प्रभावी होती. त्याचप्रमाणे सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांचा खुबीने वापर झाला. या पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेले. त्यामुळे ठाकरे गटांच्या शिवसैनिकांनी या निवडणुकीत नेटाने काम केले.
गिरीश बापट यांची उणीव भासली
कसबा विधानसभा मतदारसंघाचे प्रामुख्याने दोन भाग दिसून येतात. बाजीराव रस्त्याच्या पूर्वेला आणि बाजीराव रस्त्याच्या पश्चिमेला मतदारांची विचारसरणी आणि सांस्कृतिक बदल प्रामुख्याने दिसून येतो. पश्चिमेचा मतदार हा भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो तर पूर्वेचा मतदार हा काँग्रेसचा मतदार मानला जातो. मात्र, गिरीश बापट यांचा संपर्क हा या मतदारसंघाच्या दोन्ही बाजूला तितकाच तगडा होता. गिरीश बापट सक्रिय नसल्यामुळे या पोटनिवडणुकीत पूर्वेचा मतदार हा भाजपची साथ पूर्णपणे सोडल्याचे दिसून आले आहे. तर पश्चिम भागातील मतदारदेखील व्यक्ती पाहून मतदान करू, असे बोलताना दिसत होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपला गिरीश बापट यांची उणीव नक्कीच जाणवली आहे.
आजारी असतानाही बापट यांना प्रचारात उतरविल्याचे मतदारांना खटकले
भाजपने आजारी असतानाही खासदार गिरीश बापट यांना प्रचारात उतरविले. बापट यांना प्रचारात उतरविल्याचा भाजपला फायदा होण्याऐवजी तोटा झाला. बापट यांना आजारी असताना प्रचारात उतरविल्याचे कसब्यातील मतदारांना खटकले. मतदारांनी हे मतदानातून दाखवून दिले.
लक्ष्मी दर्शनाचा फायदा नाही तोटाच झाला
कसबा पोटनिवडणुकीत भाजपने शेवटचे दोन दिवस अक्षरश: हरीपत्ती आणि लालपत्तीचे मतदारांना वाटप केले. या निवडणुकीत मतदारांनी मतदानाला येऊ नये म्हणूनही हरीपत्ती आणि लालपत्ती वाटली; पण मतदारांनी लक्ष्मी दर्शन करूनही धंगेकर यांनाच मते दिली. त्यामुळे लक्ष्मी दर्शनाचा फायदा नाही तोटाच अधिक झाला.
ही आहेत पाच कारणे
कॉंग्रेसला फायदा, भाजपला तोटा झाल्याची
१. रवींद्र धंगेकर यांची लोकप्रियता, भाजपकडे उमेदवारीसाठी सक्षम चेहरा नव्हता.
२. महाविकास आघाडीची एकजूट, फाजिल आत्मविश्वास नडला.
३. शिवसेनेचे नाव, चिन्ह गेल्याची सहानुभूती मिळाली. पैसे वाटपाचा तोटाच झाला.
४. दुरंगी लढत टिळकांच्या घरातील उमेदवार दिला नाही.
५. पुणेरी पाट्यांसह सोशल मीडियाचा खुबीने वापर, खासदार गिरीश बापट यांची उणीव भासली.