गोड पदार्थांच्या अतिसेवनाने तरुणाला अर्धांगवायूचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 11:08 AM2018-11-21T11:08:13+5:302018-11-21T11:40:10+5:30
दिवाळीत गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे एका तरुणाला अर्धांगवायूचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. निलेश राळे असं या 25 वर्षीय तरूणाचं नाव असून पुण्यातील राजगुरु नगर येथे ही घटना घडली.
पुणे - दिवाळीत जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे एका तरुणाला अर्धांग वायूचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. निलेश राळे असं या 25 वर्षीय तरूणाचं नाव असून पुण्यातील राजगुरु नगर येथे ही घटना घडली. निलेश हायपोकॅलेमिक पीरिऑडीक पॅरालिसिस या आजारानं ग्रस्त आहे. या आजारामध्ये गोड खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागते. मात्र निलेशला त्याची गोड खाण्याची सवय चांगलीच महागात पडली आहे. दिवाळीत गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे त्याला अर्धांग वायूचा झटका आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिले आहे.
निलेश 7 नोव्हेंबर रोजी बहिणीला घरी सोडण्यासाठी गेला होता. त्यानंतर गाडी चालवताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. अशक्तपणा आल्याचे वाटत असताना स्नायूंची हालचाल बंद झाली. मात्र शरीरात नेमकं काय होत आहे हे त्याच्या लक्षात आले नाही. उपचारासाठी त्याने एका रुग्णालयाजवळ गाडी थांबवली. मात्र त्या रुग्णालयात योग्य सुविधा नसल्याने डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी दुसरीकडे जाण्याचा सल्ला दिला.
साईनाथ रुग्णालयात निलेशला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र एक्सरे आणि एमआरआयमध्ये देखील त्याच्या आजाराचं निदान होऊ शकलं नाही. त्यानंतर 12 तास निलेशला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आली. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पुढील उपचारांसाठी निलेशला जहांगीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णालयामध्ये निलेशच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी कमी झाल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आले. दिवाळीत गोड पदार्थ जास्त खाल्ल्याने रक्तातील पोटॅशियम कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केल्यामुळे त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे.