महिलांच्या सुरक्षिततेला ‘टॉप प्रायोरिटी’

By admin | Published: January 15, 2017 05:21 AM2017-01-15T05:21:15+5:302017-01-15T05:21:15+5:30

महापालिकेची आचारसंहिता लागू झाली आहे. त्याअनुषंगाने गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. शहराची कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी

Top 'Priority' for women's safety | महिलांच्या सुरक्षिततेला ‘टॉप प्रायोरिटी’

महिलांच्या सुरक्षिततेला ‘टॉप प्रायोरिटी’

Next

पिंपरी : महापालिकेची आचारसंहिता लागू झाली आहे. त्याअनुषंगाने गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. शहराची कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहेच. परंतु, शहरातील महिलांची सुरक्षितता याला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे परिमंडल ३ च्या पोलीस उपायुक्तपदाची सूत्रे स्वीकारलेले
गणेश शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले.

महापालिका निवडणुकीची परिस्थिती कशी हाताळणार आहात?
महापालिका निवडणूक फेब्रुवारीत होत आहे. कमी मनुष्यबळ असले, तरी योग्य नियोजन केले आहे. शहराचा भौगोलिक विस्तार वाढला आहे; त्यामुळे मतदान केंद्रांची संख्याही वाढेल. हे लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी योग्य प्रकारे बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन आहे. मनुष्यबळाची कमतरता असली तरी योग्य प्रकारे नियोजन करून निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

महिला छेडछाडीच्या घटना कशा रोखणार?
शहराची कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न होत असताना, महिलांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देणार आहे. शाळा-महाविद्यालये, तसेच गर्दीची ठिकाणे येथे महिलांच्या सुरक्षिततेची विशेष दक्षता घेतली जाईल. महिलांसाठी ‘प्रतिसाद’ हे अ‍ॅप उपलब्ध आहे. त्यावरून संकटग्रस्त महिलेने पोेलिसांना माहिती दिल्यास कमीत कमी वेळात बीट मार्शलचे पोलीस कर्मचारी अथवा जवळच्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्या ठिकाणी धाव घेतील. महिलांनी अशा घटनांबाबत माहिती दिल्यास वेळीच टवाळखोरांचा बंदोबस्त केला जाईल.

गुन्हेगारी अटकावासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना अवलंबणार?
सराईत गुन्हेगारांची माहिती घेतली आहे. रेकॉर्डवरील या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. वाहनांची तोडफोड तसेच दगडफेक करून नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांवर तडीपारीची कठोर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. यापूर्वी अशा प्रकारे नागरिकांमध्ये दहशत माजवून सामाजिक शांततेला बाधा पोहोचविण्याचा ज्यांनी प्रयत्न केला. त्या गुन्हेगारांवर अशीच कारवाई करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलांवरील अत्याचार कसे रोखणार?
गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीतील सहभागाला सभोवतालची परिस्थिती कारणीभूत ठरते. सहवास आणि संगतीचा परिणाम म्हणून असे प्रकार घडतात. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन झोपडपट्ट्यांमधील तरुणांना मार्गदर्शन केले पाहिजे. गुन्हेगारीपासून दूर राहण्यासाठी त्यांना वेळोवेळी समुदेशन करणे गरजेचे आहे. तरच, त्यात बदल घडून येईल. लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाणही वाढू लागले आहे. मुलांना विश्वासात घेऊन अशा घटनांबद्दल पोलिसांना कशी माहिती द्यायची, याबाबत जागरूकता निर्माण केली पाहिजे. तरच, अशा घटनांवर वेळीच नियंत्रण आणता येईल.

शब्दांकन : संजय माने

Web Title: Top 'Priority' for women's safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.