मशाल मिरवणुकीने तोरणागड उजळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 01:50 AM2018-10-21T01:50:23+5:302018-10-21T01:50:29+5:30
दसरा सणाच्या निमित्ताने मावळा जवान संघटना व वेल्हे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या मशाल मिरवणुकीने हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू तोरणागड उजाळून निघाला.
मार्गासनी : दसरा सणाच्या निमित्ताने मावळा जवान संघटना व वेल्हे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या मशाल मिरवणुकीने हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू तोरणागड उजाळून निघाला. फटाक्यांच्या आतषबाजीत, हर हर महादेव, जय शिवराय या जयघोषांनी तोरणागडाची दरीखोरी निनादली. पारंपरिक रिवाजात छत्रपती शिवाजी महाराज यांना मावळ्यांतर्फे मानवंदना देण्यात आली.
गडावरील शिवकालीन मेंगाईदेवीच्या महापूजेने मशाल मिरवणुकीला सुरुवात झाली. देवीचे मानकरी प्रमोद पवार, विलास पांगारे, संदीप नगिणे, अनिल भुरूक, गोरख भुरूक, रामभाऊ राजीवडे, अशोक सावंत, अशोक पवार, हेमंत पाटील, तानाजी राजीवडे, बापू साबळे, सुनील गाडे, संजय भुरूक आदींसह शेकडो तरुण सहभागी झाले होते.
हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू म्हणून या गडाचे मोठे स्थान आहे. गडावरील शिवकालीन मेंगाईदेवी, तोरणजाई आदी देवतांचा नवरात्र उत्सव, दसरा सण गडावर शिवकाळापासून साजरा केला जात आहे. मशाल मिरवणुकीने तोरणागडाच्या इतिहासाला, छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
>शिवरायांच्या देदीप्यमान इतिहासाचे झाले पुन:स्मरण
तोरणागडाच्या बिन्नी दरवाजापासून झुंजारमाची ते कोकण दरवाजापर्यंतचा गडाचा परिसर शेकडो मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी परकी मोगलांच्या जुलमी राजवटीविरुद्ध मूठभर मावळ्यांच्या साथीने यशस्वी लढाई करून तोरणागड जिंकला. तोरणागड हा स्वराज्याचा पहिला किल्ला.