भाेरमध्ये वादळी पावसाने झोपड्या उडाल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:20+5:302021-05-20T04:11:20+5:30
भोर : महुडेखुर्द गावच्या हुंबेवस्ती येथील धनगर वस्तीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे तात्पुरते महुडेखुर्द गावात राहण्यास आलेल्या ३० ...
भोर : महुडेखुर्द गावच्या हुंबेवस्ती येथील धनगर वस्तीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे तात्पुरते महुडेखुर्द गावात राहण्यास आलेल्या ३० नागरिकांच्या झोपड्यांचे वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे या झोपड्या उडून गेल्याने अन्नधान्य, कपडे तसेच जनावरांचा चारा भिजल्याने ३० नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, या सर्वांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भोर शहरापासून ८ किलोमीटरवर असलेल्या महुडेखुर्द येथे गावापासून डोंगरात २ किलोमीटरवर हुंबेवस्ती आहे. तेथे ८ ते १० कुटुंब असून ३० नागरिक राहतात. वस्तीत येण्यासाठी ना रस्ता, ना उन्हाळयात पिण्यासाठी पाणी यामुळे येथील नागरिक जनावरे पाळून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्यामुळे येथील लोक आपल्या कुंटुंबासह जनावरे घेऊन महुडेखुर्द गावात राहण्यास येतात. पाऊस सूरु होऊन पाण्याचे झरे सुरु झाले कि आम्ही पुन्हा आमच्या वस्तीत राहण्यास जात असल्याचे हुंबेवस्ती येथील धनगरवस्तीतील धनाजी शंकर हुंबे व बमाबाई हुंबे, भिकाबाई हुंबे यांनी सांगितले.
धनगर समाजाच्या लोकांनी महुडेखुर्द गावात बांबू व कागद लावन तात्पुरत्या उभारलेल्या झोपड्या वादळी वारे व पावसाने उडाल्या असून पावसात साठवलेले अन्नधान्य, कपडे, अंथरुण, पांघरुन भिजले आहे. यामुळे लहान मुलाबांळासह अबालवृध्दांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर जनावरांचा चाराही भिजला आहे. येथील सर्व कुटुंबे जनावरांच्या दुधाची विक्री करुन आपला उदरनिर्वाह भागवतात. यामुळे नागरिकांची दोन्ही बाजूने अडचण झाली आहे. त्यामुळे शासनाने येथील लोकांना राहण्याची सोय करावी.
त्यांना धान्याचे किट व झाेपड्यांना लावायला ताडपत्र्याची सोय करण्याची मागणी येथील नागरिकांनी तहसीलदारांकडे केल्याचे काँ विठठल करंजे यांनी सांगितले.
१९ भोर नुकसान
महुडेखुर्द गावात वादळी वारे आणि पावसामुळे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या झोपड्यांचे झालेले नुकसान.