Weather Update : राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस; सर्वदूर पावसासाठी 'वेट अँड वॉच'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 07:53 PM2021-06-29T19:53:02+5:302021-06-29T19:54:37+5:30
पुढील चार दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
पुणे : राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मॉन्सूनच्या वाटचालीस अनुकूल परिस्थिती नसल्याने पुढील ६ ते ७ दिवस मॉन्सूनची आगेकुच होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. राज्यात पुढील चार दिवसात कोणताही अलर्ट देण्यात आला नसून सर्वदूर पावसासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गेल्या २४ तासात संगमेश्वर, देवरुख १००, जव्हार ९०, वसई ८०, हर्णे, विक्रमगड ५०, दाभोलीम, पालघर ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रातील ओझरखेडा ८०, दहीगाव ७०, जामनेर, निफाड, साक्री ६०, अकोले, नेवासा ५०, बोडावद, पाचोरा, पारोळा, संगमनेर, सटाणा, बागलाण ४० मिमी पाऊस पडला. याशिवाय काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
मराठवाड्यातील सोयेगाव १००, गंगापूर, लोहा, वाशी ५०, औसा, भोकरदन, पालम ३०, बदनापूर, लातूर, मंथा, पूर्णा, शिरुर अनंतपाल २० मिमी पाऊस पडला. विदर्भातील सिंधखेड राजा ५०, चिखली, मोताळा, वर्धा ४०, चांदूर, देऊळगाव राजा, देवळी, कोरपना, मलकापूर, मेहकर, नागपूर, सेलू ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. घाटमाथ्यावर काही ठिकाणी पाऊस झाला.
मंगळवारी दिवसभर महाबळेश्वर, नागपूर येथे हलका पाऊस झाला.
पुढील चार दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.