कर्जमाफीसाठीचे तब्बल १ लाख अर्ज अपात्र , उर्वरित गावांतील चावडी वाचन लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 03:00 AM2017-10-18T03:00:08+5:302017-10-18T03:00:38+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल १ लाख १४ हजार ८४६ अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेसाठी २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज आले होते.
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल १ लाख १४ हजार ८४६ अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेसाठी २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज आले होते, अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे. अर्ज बाद झाल्याची अधिकृत आकडेवारी सल्याचे सहकार विभागातील अधिकाºयांनी सांगितले आहे. परंतु, एकूण अर्जांपैकी दहा ते बारा टक्के अर्जबाद होणार असल्याचे दिसून आल्याचे सांगितले आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळविण्याकरिता राज्यातील शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी २२ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार अर्ज आले. ३० जून रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तर कर्ज परतफेड करणाºयांना पंचवीस टक्के तर, कमाल पंचवीस हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर निधी अशा तीन टप्प्यांत लाभ देण्यात येणार आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २ लाख ९९ हजार, व्यावसायिक आणि खासगी बँकांचे अनुक्रमे ४० हजार असे एकूण ३ लाख ३९ हजार कर्जदार शेतकरी जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला दिली होती.
पुण्यात शेती असलेल परंतु, पुण्याबाहेर राज्यभरातील विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या शेतकºयांची संख्या ५ हजार ४३५ एवढी असल्याचे छाननी प्रक्रियेमध्ये निष्पन्न झाले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून आलेल्या २ लाख ९८ हजार ५६ अर्जांमध्ये या अर्जांची भर पडली असून, जिल्ह्यातून कर्जमाफीकरिता एकूण ३ लाख ३ हजार ४९१ अर्ज प्राप्त झाल्याची नोंद शासन स्तरावर आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील १ हजार ४६४ गावांमध्ये कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या अर्जदारांच्या याद्यांचे जाहीर चावडी वाचन करण्यात आले आहे.
चावडी वाचनामध्ये १ हजार २४१ गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण झाले आहे तर, ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने २२३ गावांमध्ये चावडीवाचनाची प्रक्रिया होऊ शकलेली नाही. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया संपल्याबरोबरच लागलीच उर्वरित गावांमधील चावडीवाचन होणार आहे.
कोणते टप्प्यातील अर्ज अधिक बाद ?
योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी करताना एकूण अर्जांपैैकी दहा ते बारा टक्के अर्ज बाद होण्याचा अंदाज होता. मात्र, जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी अपात्र झाल्याची अधिकृत आकडेवारी आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. राज्य शासनाकडून तीन टप्प्यांमध्ये कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या टप्प्यातील आकडेवारी समोर आली आहे, याबाबत माहिती नाही, अशी माहिती सहकार विभागाकडून मंगळवारी देण्यात आली.