महापालिका हद्दीत समाविष्ट गावांमध्ये होणार रस्ते, प्रत्येक गावाला १ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 02:40 AM2018-07-12T02:40:09+5:302018-07-12T02:40:24+5:30
न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांची परवड थांबण्याची शक्यता अखेर निर्माण झाली आहे.
पुणे : न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांची परवड थांबण्याची शक्यता अखेर निर्माण झाली आहे. या गावांमधील प्रमुख रस्त्यांची कामे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असून, लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध होणार आहे. प्रत्येक गावासाठी १ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी फक्त रस्त्यांच्या कामांना म्हणून मंजूर करण्यात आला आहे.
पथ विभागाचे प्रमुख अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली. या ११ गावांमधील प्रमुख रस्त्यांच्या कामांना महापालिका प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
रस्तेही निश्चित करण्यात आले
असून, त्यांचे खर्चाचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहे.
येत्या तीन आठवड्यांत या कामांच्या निविदा जाहीर होतील, असे पावसकर यांनी सांगितले. शिवणे, उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, लोहगाव, फुरसुंगी, उरुळी देवाची, मुंढवा, साडेसतरानळी, उंड्री अशा ११ गावांतील मुख्य रस्त्यांची कामे करण्यात येणार आहे.
महापालिकेत समावेश होतात तेथील ग्रामपंचायती त्वरित विसर्जित करण्यात आल्या. मात्र, त्यामुळे ग्रामपंचायत नाही व महापालिका तिथे काही काम करायला तयार नाही अशी या गावांची स्थिती झाली. स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका प्रशासनाच्या तीन-चार बैठका झाल्या, त्यातही गावांमध्ये विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने सरकारने गावांचा समावेश तर केला, मात्र तेथील कामांसाठी महापालिकेला काहीही निधी दिला नाही, निधी नसल्यामुळे महापालिकेलाही तिथे काही काम करता येईनासे झाले.
तिढा सुटणार कसा : नागरीककरण झाले पण समस्या कायम
बहुसंख्य गावांचे आधीच नागरीकरण झाले आहे. त्या तुलनेत सुविधा मात्र काहीही नाहीत. सर्वच गावांमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शिवणे-उत्तमनगर परिसरातील मुख्य एनडीए रस्त्याचेही काम करण्यात येणार आहे. अखेरीस स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या गावांच्या विकासासाठी म्हणून सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात १०० कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातील काही निधी आता महापालिकेकडून रस्त्यांच्या कामासाठी म्हणून वापरण्यात येणार आहे.
सर्व गावांमधील प्रत्यक्ष पाहणीनंतर काही रस्ते निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती पावसकर यांनी दिली. हे रस्ते गावातील प्रमुख रस्ते आहेत. त्यावरून वाहतूक होत असते. त्या तुलनेत त्यांचे काम यापूर्वी व्यवस्थित होत नव्हते, आता मात्र महापालिकेच्या पद्धतीने ते रस्ते तयार करण्यात येणार आहेत, असे पावसकर म्हणाले.