तोतया ACB अधिकाऱ्यांची उपसंचालकाच्या घरी धाड; खऱ्या पोलिसांची एंट्री अन् तोतयांनी ठोकली धूम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 03:12 PM2022-06-25T15:12:53+5:302022-06-25T15:26:25+5:30
अधिकाऱ्यांना फोन करण्याचा बहाणा करुन या तोतयाने धूम ठोकली...
पुणे: ईडी, सीबीआयप्रमाणे पहाटेच आम्ही ॲन्टी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगर रचना उपसंचालकाच्या घरात ते शिरले. त्यांच्यावर कारवाईचा बहाणा करीत असताना वारजे पोलिसांची एंट्री झाली. तेव्हा महिला पोलीस उपनिरीक्षकांना आम्हाला कल्पना न देता कसे आलात, असे म्हणत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करण्याचा बहाणा करुन या तोतयाने धूम ठोकली.
याप्रकरणी नगर रचना विभागाचे उपसंचालकांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साध्या वेशातील सावंत व पोलीस गणवेशातील एक पुरुष व महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कर्वेनगरमधील दत्त दिगंबर कॉलनीत शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ॲन्टी करप्शनकडून आलो असल्याचे या तोतयाने २३ जून रोजी तुमच्या ऑफिसमध्ये काय झाले याची विचारणा केली. त्यांनी त्यांच्याकडील एका व्हिडिओ दाखवून त्यामध्ये एक इसम झोन दाखल्याबाबत आला होता. त्याबाबत फिर्यादीने आरोपीना माहिती दिली. त्यावर या तोतयाने तुमच्या ऑफिसमधील एकाने झोन दाखल्यासाठी आलेल्याकडे पैशांची मागणी करुन काही रक्कम स्वीकारली. तसेच तुमचे नाव देखील आले आहे. तुम्हाला त्यात अटक करुन तुमची प्रॉपर्टी जप्त करावी लागेल, असे सांगितले.
हे तुम्हाला नको असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे तो तोतया अधिकारी बोलला. याचवेळी वारजे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील तेथे पोहचल्या. त्यांना पाहून या तोतयाने तुम्ही आम्हाला कल्पना न देता या ठिकाणी कसे आलात, तुमच्या सिनिअर पी आयचा नंबर द्या, असे त्यांना म्हणाला. त्यांनी नंबर दिल्यावर त्यांना फोन लावण्याचा बहाणा करुन तो घराबाहेर गेला व तेथून तो पळून गेला.
याबाबत वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले की, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरु असेल तर त्यात हस्तक्षेप केला जात नाही. नाही तर तुमच्यामुळे आमची कारवाई फसली, असे म्हणून संबंधित अधिकार्याला दोष दिला जातो. कर्वेनगरमध्ये कारवाई सुरु असल्याचे समजल्यावर पोलीस अधिकार्यांना पाठविले होते.
पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार ते आपण गेलो होतो. त्यावेळी त्याने आपल्यालाच तुम्ही कशा आलात, असे विचारुन माझ्याकडून सिनिअरांचा नंबर घेतला. त्यावेळी मला सिनिअरांना फोन येत होता. पण तोही घेऊन दिला नाही. सिनिअरांशी बोलण्याचा बहाणा करुन तो घराबाहेर गेला. तेव्हा आम्ही घरातच वाट पहात होतो. काही वेळाने बाहेर येऊन पाहिल्यावर तो पळून गेल्याचे लक्षात आले. वारजे पोलीस अधिक तपास करीत आहेत.