तोतया पोलीस अधिकाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:28 AM2020-12-15T04:28:05+5:302020-12-15T04:28:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस अधिकारी असल्याचे भासविण्यासाठी पोलिसांचा गणवेश परिधान करुन पत्नीच्या बँकिंग परीक्षेसाठी पुण्यात आलेल्या एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस अधिकारी असल्याचे भासविण्यासाठी पोलिसांचा गणवेश परिधान करुन पत्नीच्या बँकिंग परीक्षेसाठी पुण्यात आलेल्या एका तोतया पोलिसाला वानवडी पोलिसांनी अटक केली. पत्नीला आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगितल्याने गणवेश घातल्याचे त्याने सांगितले.
भाऊसाहेब महादेव गोयकर (वय २५, रा. गुरव पिंपरी, थिटेवाडी, ता. कर्जत, अहमदनगर) असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे.
वानवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी साठे उद्यानाजवळ एक पोलिसांच्या गणवेशात एक जण त्यांना दिसून आला. त्याच्या खांद्यावर मपो ऐवजी मपोसे असे लावले होते. त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. त्याच्याकडे ओळखपत्र नव्हते. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने पोलीस नसल्याचे कबुल केले.
भाऊसाहेब गोयकर हा सध्या चाकण येथे राहतो. त्याचा फ्रॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. लॉकडाऊनमध्ये आपण पोलिसात भरती झाले आहे, असे त्याने खोटेच पत्नीला सांगितले होते. पत्नीला खरे वाटावे म्हणून गणवेश घालून रामटेकडी येथे पत्नीबरोबर बँकिंगच्या परीक्षेसाठी आलो होतो, असे त्याने सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडून पोलीस गणवेश, मोबाईल, रोख रक्कम, मोटारसायकल असा २ लाख १५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.