तोतया पोलीस उपनिरीक्षकाने घातला ५१ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:23+5:302021-06-30T04:08:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई पोलीस दलात अधिकारी असल्याची बतावणी करत एका महिलेच्या साथीने कस्टममध्ये नोकरी लावतो, असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई पोलीस दलात अधिकारी असल्याची बतावणी करत एका महिलेच्या साथीने कस्टममध्ये नोकरी लावतो, असे सांगून तिघांना ५१ लाख १७ हजार ४०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट नियुक्ती पत्र देऊन अजून पैसे हडपण्याचा त्याचा डाव लक्षात आल्याने सापडू शकला.
राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४३, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे. त्याची साथीदार सुलोचना दादू सोनवणे (वय ३७, रा. टिंगरेनगर) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिंदे याच्या घरातून ५ ते ६ पोलिसांचे गणवेश व दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. हा प्रकार २०१७ पासून आतापर्यंत सुरू होता. याप्रकरणी दीपक मोहनलाल मुंदडा (वय ५१, रा. शनिवार पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
मुंदडा यांचा गणेशमूर्ती विक्रीचा व्यवसाय आहे. तोतया शिंदे हा त्यांच्याकडे २०१४ मध्ये मूर्ती खरेदी करण्यासाठी आला होता. त्या वेळी त्याने आपण मुंबई पोलीस दलात अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यातून पुढे त्यांच्यात ओळख झाली. दरम्यान, शिंदे याने मुंदडा यांना आपली कस्टम ऑफिसमधील अधिकारी ओळखीचे आहेत. तेथे मी तुमच्या मुलांना नोकरी लावून देतो, असे सांगितले. तो पोलीस असल्याचे सांगत असल्यामुळे त्यांचा विश्वास बसला. तो जेव्हा जेव्हा मुंदडा यांना भेटला. तेव्हा त्याच्या गाडीत पोलिसांचा गणवेश होता. त्याच्याबरोबर असलेली सुलोचना सोनावणे ही कस्टम विभागात अधिकारी असल्याचे शिंदे सांगत असे. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने ज्या मुलांना नोकरी लावणार आहे, त्यांना साहित्य पाठवून दिले होते. तसेच त्यांना मुंबईला नेऊन एका रुग्णालयात मेडिकलही करून घेतली होती.
तरुणांकडून क्लार्कपदासाठी प्रत्येकी १५ लाख, तर सुपरिटेंडेंट पदासाठी २५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून वेळोवेळी ५१ लाख १७ हजार रुपये घेतले होते. पैसे घेतल्यावर वेगवेगळी कारणे सांगून त्याने टाळाटाळ केली होती. फिर्यादीचा मित्र चंद्रकांत चव्हाण यांच्याकडूनही मुलाला नोकरी लावतो, असे सांगून पैसे घेतले.