स्मार्ट सिटीसाठी तगडे आव्हान

By admin | Published: December 2, 2015 04:15 AM2015-12-02T04:15:08+5:302015-12-02T04:15:08+5:30

केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये देशभरातून २० शहरांची निवड करण्यात येणार होती; मात्र आता केवळ ८ ते १० शहरे पहिल्या टप्प्यासाठी निवडण्याचा

A tough challenge for the smart city | स्मार्ट सिटीसाठी तगडे आव्हान

स्मार्ट सिटीसाठी तगडे आव्हान

Next

पुणे : केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये देशभरातून २० शहरांची निवड करण्यात येणार होती; मात्र आता केवळ ८ ते १० शहरे पहिल्या टप्प्यासाठी निवडण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला आहे. निवडण्यात येणाऱ्या शहरांची संख्या अचानक निम्म्याने कमी झाल्याने, पहिल्या टप्प्यात समावेशासाठी पुण्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. केंद्र शासनाकडे पाठविण्याचा स्मार्ट आराखडा तयार झाला असून, उद्या बुधवारी तो स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे.
स्मार्ट सिटीचा प्रस्ताव महापालिकेला राज्य शासनामार्फत १५ डिसेंबरच्या आत केंद्र शासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे. या प्रस्तावाला स्थायी समिती व मुख्य सभेची मान्यता त्यापूर्वी घ्यावी लागणार असल्याने खूपच कमी वेळ हाती राहिला आहे. मंगळवारी स्थायी समितीसमोर हा आराखडा सादर केला जाणार आहे. वेळापत्रकानुसार पुढील मुख्य सभा १५ डिसेंबरला असल्याने, त्यापूर्वीच याला मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या मंजुरीनंतर स्मार्ट आराखड्याच्या मंजुरीसाठी विशेष सभा बोलविली जाणार आहे. स्थायी मंजुरीनंतर, तो प्रस्तावित आराखडा संकेतस्थळावर नागरिकांसाठी जाहीर केला जाणार आहे.
महापालिकेने राबविलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये ३ लाख ७ हजार कुटुंबांचा सहभाग घेऊन स्मार्ट सिटी कशी असावी, यासाठी अर्ज भरून दिले. त्यानुसार नागरिकांचा प्राधान्य क्रम महापालिकेकडून निश्चित करण्यात आला आहे. वाहतूक आणि दळणवळण, पाणी व मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण व शाश्वत उपाय, सावधानता व सुरक्षा, ऊर्जा व वीजपुरवठा हे प्रमुख ६ विषय निवडण्यात आले होते. सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न वाहतुकीचाच असल्याचे ३० टक्के नागरिकांनी नमूद केले आहे. पाणीपुरवठा व मलनि:सारण यास २५ टक्के जणांनी प्राधान्य दिले आहे. घनकचरा व्यवस्थापनास २२ टक्के, पर्यावरणास १२ टक्के, सुरक्षितेस ३ टक्के, ऊर्जा व वीजपुरवठ्यास २ टक्के नागरिकांनी प्राधान्य दिले आहे. नागरिकांनी पहिल्या टप्प्यामध्ये सुंदर व स्वच्छ पुण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले.
नागरिकांना महत्त्वाचे वाटणारे प्रश्न लक्षात आल्यानंतर, आता त्यावर काय करता येईल, याचा सखोल पद्धतीने विचार करण्यात आला. वाहतूकप्रश्न, पाणीप्रश्न, कचराप्रश्न असे एक एक विषय घेऊन,
त्यावर कार्यशाळा घेण्यात
आल्या. त्याचबरोबर तज्ज्ञांची मते जाणून त्याची उकल कशी करता येईल, याची मांडणी आराखड्यात करण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)

अथक प्रयत्नांनंतर आराखडा तयार
आयुक्त कुणाल कुमार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा महिन्यांपासून स्मार्ट सिटी सेल व पालिकेतील इतर अधिकारी, कर्मचारी हा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यासाठी झटत होते. महापालिकेतील अधिकारी, तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था व संघटनांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्या शेकडो बैठका यासाठी घेण्यात आल्या. लाखो नागरिकांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेऊन, त्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा, सूचना, शिफारशींवर आधारित असा हा आराखडा बनविण्यात आला आहे.

स्थायीसमोर आज उलगडणार
महापालिका प्रशासनाने तयार केलेला स्मार्ट सिटीचा आराखडा आज स्थायी समितीच्या सदस्यांसमोर सादर केला जाईल. पर्यावरणपूरक, वाहतूक समस्यांची उकल करणारा, स्वच्छ व सुंदर पुण्यावर भर देणारा, असा हा आराखडा असल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर स्मार्ट सिटीचा प्रस्तावित आराखडा नागरिकांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

मंजुरीसाठी फिल्डिंग
स्मार्ट सिटी आराखडा केंद्र शासनाकडे मुदतीमध्ये सादर करण्यासाठी बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याला मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
त्याकरिता आयुक्तकुणाल कुमार यांनी मंगळवारी महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम व इतर सदस्यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिली. स्मार्ट सिटी आराखड्याबरोबरच नदी सुधार प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्ती व सायकल एकात्मिक प्रकल्प, या ३ विषयांना मंजुरी देण्याची विनंती कुणाल कुमार यांनी केली.

Web Title: A tough challenge for the smart city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.