पुण्याची ओळख: पानिपतचा सूड उगवणाऱ्या महादजींचे देखणे स्मारक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 04:26 PM2023-07-13T16:26:22+5:302023-07-13T16:30:50+5:30
पाहताक्षणीच मन वेधून घेणारे हे स्मारक ज्यांचे आहे त्या महादजी यांची माहिती घेणे आवश्यक आहे. कोण होते महादजी शिंदे?...
- राजू इनामदार
वानवडीमधील महादजी शिंदे यांची छत्री म्हणजे त्यांचे स्मारक आहे. ते इतके देखणे आहे की पाहतापाहता पुण्याची ओळख होऊन गेले. शाळांच्या सहलींमध्ये या स्मारकाचा समावेश असतोच असतो. बरीचशी राजस्थानी व थोडी इंग्रजी बांधकामाची शैली असणारी ही वास्तू साध्या बांधकामातही किती सौंदर्य आणता येते याचा उत्तम नमुना आहे. पाहताक्षणीच मन वेधून घेणारे हे स्मारक ज्यांचे आहे त्या महादजी यांची माहिती घेणे आवश्यक आहे.
कोण होते महादजी शिंदे?
महादजी शिंदे हे ‘बचेंगे ते और भी लढेंगे’ म्हणणाऱ्या दत्ताजी शिंदे यांचे भाऊ. राणोजी शिंदे यांचे पुत्र. पानिपतच्या लढाईत महादजी होते. तिथून येताना त्यांच्या पायाला दुखापत झाली. पाय अधू झाला. पण नंतरच्या त्यांच्या पराक्रमावर याचा काहीच परिणाम झाला नाही. महादजी यांनी पानिपतानंतर अल्पावधीतच त्याच प्रांतात मराठ्यांचा वचक बसवला व तो वाढवत नेला. तो इतका वाढला की दिल्लीच्या तख्तावर कोणाला बसवायचे हे महादजींच्या मसलतीशिवाय ठरत नसे. पानिपतच्या पराभवाची मराठी मनावरची भळभळती जखम याच महादजी शिंदे यांनी त्यानंतर अवघ्या १० वर्षात पुसली.
महादजींची पुण्याला देणगी
महादजींची पुणे शहराला आणखी एक देणगी आहे, ती काहीशी दुर्लक्षित राहिली आहे. रंगपंचमी व कृष्णजन्माष्टमी हे दोन सण दिल्ली परिसरात फार उत्साहात साजरे होत असत. महादजींनी आयुष्याचा बराच मोठा काळ त्याच भागात काढला. सवाई माधवराव पेशवे यांची भेट घेण्यासाठी महादजी एकदा पुणे मुक्कामी आले होते. पेशव्यांचे वय त्यावेळी लहान होते. त्यांच्या मनोरंजनासाठी म्हणून हे दोन सण जाहीरपणे साजरे करण्यास पुण्यात सुरूवात झाली असे म्हणतात.
वानवडीत असे मुक्काम
महादजींबरोबर सैन्याचा मोठा संरजाम असे. त्यामुळे ते थेट पुण्यात न येता वानवडीमध्ये थांबत. तिथे त्यांची छावणी असे. तिथून ते पेशव्यांच्या भेटीसाठी पुण्यात येत. १७९४ मध्ये (१२ फेब्रुवारी) महादजींचे वानवडीतच निधन झाले. त्यावेळी ते ६७ वर्षांचे होते. त्यांचे वशंज माधवराव शिंदे (प्रथम) यांनी सन १९२५ मध्ये वानवडीतील हे स्मारक बांधले. तिथेच महादजींनी बांधलेले शिवमंदिर आहे. त्याला धरूनच आता सिंधिया ट्रस्टने तिथे चांगले काम केले आहे.
असे आहे स्मारक
हे स्मारक म्हणजे एक चौकौनी आकाराची एक देखणी वास्तूच आहे. त्यात भरपूर कमानी आहेत. त्यावर कोरीव काम आहे. नक्षी आहे. रंगीत काचा असलेल्या खिडक्या ही इंग्रजी शैली आहे. ती या राजस्थानी शैलीच्या बांधकामात एकदम मिसळून गेली आहे. आतील नक्षीदार खांब, वरच्या मजल्याचा सुरेख कठडा, आतील कोरीव कामांच्या महिरपी हे सगळं फारच देखणे आहे. विशेष म्हणजे त्याची निगराणी ट्रस्टच्या वतीने फार चांगली ठेवण्यात येते. त्यामुळे हे जुने ऐतिहासिक आहे असे वाटतच नाही. सगळे वापरातले व त्यामुळे आपले आहे असे वाटत राहते. शिंदे घराण्यातील व्यक्तींची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. खरे तर तिथे मराठेशाहीतील दैनंदिन वापराच्या वस्तूंचे, शस्त्रांचे एक कायमस्वरूपी प्रदर्शनही ठेवायला हरकत नाही. होईलही पुढेमागे तसे कदाचित.