मोसे खोऱ्यात वाढणार पर्यटन
By admin | Published: June 2, 2017 01:53 AM2017-06-02T01:53:30+5:302017-06-02T01:53:30+5:30
वरसगाव धरण परिसरातील दुर्गम भागातील रस्ते ताम्हिणी घाट तसेच कोकणाला जोडणार असल्याने या भागात पर्यटनाला
लोकमत न्यूज नेटवर्क
पिरंगुट : वरसगाव धरण परिसरातील दुर्गम भागातील रस्ते ताम्हिणी घाट तसेच कोकणाला जोडणार असल्याने या भागात पर्यटनाला चालना मिळणार आहे. या परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या परिसरातील नागरिकांचा विकास यामुळे होणार आहे. यासाठी या भागातील पानशेत धरणमार्गे साई खुर्द, मोशे खुर्द व ताम्हिणी रस्त्याची सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे यांनी नुकतीच पाहणी केली.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून वरसगाव धरण परिसरातील रस्त्यांचा विकास हा रखडला आहे. यामुळे हा परिसर विकासापासून वंचित राहिला आहे. पावसाळ्यात अतिपर्जन्यमानामुळे या परिसराचा संपर्क तुटतो. यामुळे या परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. मात्र या परिसराच्या विकासासाठी वरसगाव धरण भागातील दुर्गम रस्ते ताम्हिणी घाटमार्गे कोकणाला जोडली जाणार आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या उंच डोंगररांगातील या परिसरात पर्यटनास चालना मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने या भागातील पानशेत धरणमार्गे साई खुर्द, मोशे खुर्द व ताम्हिणी रस्त्यासाठी नऊ कोटी रुपये मंजूर केलेले आहे.
या रस्त्यामुळे ऐतिहासिक मोसे खोऱ्यातील तव (ता. मुळशी), गडले, साई खुर्द, सांडघर, धडवली आदी खेड्यातील मावळ्यांना पर्यटनामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने चालू आर्थिक अंदाजपत्रकात खास बाब म्हणून या निधीस मंजुरी दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राहणे यांनी वरसगाव धरणाच्या डाव्या तीरावरील माथ्यापासून सुरू होणाऱ्या या रस्त्याची साई खुर्दमार्गे थेट तव गाव (ता. मुळशी) पर्यंत पाहणी केली. कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, मुळशी विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल शिंदे तसेच शाखा अभियंता धनराज दराडे, यांच्यासह तव गावच्या सरपंच पल्लवी लालासाहेब पासलकर, तवचे सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब पासलकर व आदींसह स्थानिक नागरिक पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.
उपविभागीय अभियंता अनिल शिंदे म्हणाले पानशेतजवळील साई खुर्दमार्गे तव गाव ते ताम्हिणी घाट असा हा ५७ किमीचा रस्ता आहे. राज्य सरकारने चालू आर्थिक अंदाजपत्रकात त्यासाठी नऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. त्यामध्ये पानशेत धरणमार्गे साईव खुर्द सांडवघर, मोसे खुर्द, धडवली ते तवगाव अशा मार्गे हा रस्ता असेल व कालांतराने तवगाव ते वडवली, साघरी, गडले, धामणओळ, मुगाव मार्गे ताम्हिणीला जोडणार आहे.
रस्त्याच्या नियोजित कामांची कार्यवाही सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कामांचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. निविदा मंजूर झाल्यावर पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाची सुरुवात केली जाणार आहे. वरसगाव धरणाच्या डाव्या तीरावरील उंच डोंगरावर असलेल्या तव, मोसे खुर्द, सांडवघर आदी दुर्गम भागातील खेडोपाडी गावांमध्ये जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता नाही. त्यामुळे येथील नागरिकांची पावसाळ्यात मोठी गैरसोय होते. वरसगाव धरणाच्या उजव्या तीरावरील दासवे येथे आलिशान लवासा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांचा विकास झाला आहे.