पर्यटकांची पुणे दर्शन बससेवेला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 02:50 PM2019-06-09T14:50:24+5:302019-06-09T14:53:14+5:30
पुण्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या पुणे दर्शन बसला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बसच्या उत्पादनात देखील वाढ झाली आहे.
पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील विविध ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक महत्व असलेली ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांनी पुणे दर्शन बससेवेला पसंती दिली आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये या बसला फुल्ल होत आहेत. त्यामुळे या बसच्या उत्पन्नात दुपटीने भर पडली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)मार्फत मागील काही वर्षांपासून पर्यटकांसाठी ‘पुणे दर्शन’ ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत शहर व परिसरातील जवळपास २० ठिकाणांचे दर्शन घडविले जाते. त्यासाठी केवळ ५०० रुपये तिकीट असून दोन वातानुकूलित बस उपलब्ध आहेत. त्यासाठी पुणे स्टेशन व डेक्कन जिमखाना येथील बसस्थानकाप्रमाणेच आॅनलाईन बुकींगही करता येते. ही सेवा वर्षभर सुरू असली तरी प्रामुख्याने सुट्टीच्या दिवसांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी असल्याने या बसला दररोज गर्दी होत आहे. साधारणपणे एप्रिल महिन्यापासूनच पर्यटकांनी पुणे दर्शनला पसंती दिली आहे. मात्र, मे महिन्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी झाल्याचे दिसते.
मे महिन्यात १ हजार ७०० पर्यटकांनी या बसमधून प्रवास करीत पुण्यातील प्रसिध्द ठिकाणांना भेट दिली. दररोज प्रतिबस २७ पर्यटकांनी बुकिंग केले होते. या माध्यमातून पीएमपीला तब्बल ८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात हे प्रमाण निम्मे होते. जानेवारीमध्ये ७४७ पर्यटकांनी या सेवेचा लाभ घेतला होता. एप्रिल महिन्यात त्यामध्ये काहीशी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. जून महिन्यामध्ये पावसाळा तसेच शाळा सुरू होणार असल्याने पर्यटकांची संख्या निम्म्याने रोडावते. सुट्टीच्या दिवशीही हे प्रमाण काहीसे वाढते.
पुणे दर्शनची ठिकाणे
शनिवारवाडा, सारसबाग, राजा दिनकर केळकर संग्रहालय, क्रिकेट संग्रहालय, लाल महल, शिंदे छत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, आगा खान पॅलेस,दगडूशेठ गणपती मंदीर, केसरीवाडा, महात्मा फुले वाडा, चतु:श्रृंगी माता मंदीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, जोशी रेल्वे संग्रहालय, पु. ल. देशपांडे उद्यान, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, युध्द स्मारक, आदीवासी वस्तु संग्रहालय, महालक्ष्मी मंदीर.
पुणे दर्शन बसचे उत्पन्न
महिना प्रवासी उत्पन्न
जानेवारी ७४७ ३ लाख ७३ हजार ५००
फेब्रुवारी ६६२ ३ लाख ३१ हजार
मार्च ८२८ ४ लाख १४ हजार
एप्रिल १०९३ ५ लाख ४६ हजार ५००
मे १६९९ ८ लाख ४९ हजार ५००