राजा केळकर संग्रहालयाला पहिल्याच दिवशी पर्यटकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:36+5:302021-01-13T04:23:36+5:30
पुणे : कोरोना काळातील मोठ्या प्रतीक्षेनंतर पुणेकरांनी ऐतिहासिक वस्तूंवरील आपले प्रेम दाखवत सुखद धक्का दिला. पहिल्याच दिवशी तबबल २५१ ...
पुणे : कोरोना काळातील मोठ्या प्रतीक्षेनंतर पुणेकरांनी ऐतिहासिक वस्तूंवरील आपले प्रेम दाखवत सुखद धक्का दिला. पहिल्याच दिवशी तबबल २५१ पर्यटकांनी बाजीराव रस्त्यावरील राजा दिनकर केळकर संग्रहालयाला भेट दिली. दिवे, वाद्ये, शस्त्रास्त्रे, धातूंची भांडी, कातडी बाहुल्या, लाकडी कोरीवकाम अशा पारंपरिक वस्तूंचा मोठा संग्रह असलेल्या दालनांमधील ऐतिहासिक वैभव पर्यटकांनी डोळ्यात साठवून घेतले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर ३१ मार्चपासून शहरातील संग्रहालये बंद करण्यात आली होती. तब्बल साडेनऊ महिन्यांनंतर सुरक्षित अंतराच्या सर्व नियमांचे पालन करून केळकर संग्रहालय रविवारपासून खुले झाले.
राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक डॉ. दिनकर गंगाधर केळकर यांनी संग्रहालयासाठी पहिली वस्तू मिळविल्याच्या घटनेची शताब्दीपूर्ती आणि केळकर यांचा जन्मदिन असे दुहेरी औचित्य साधून रविवारपासून (१० जानेवारी) राजा दिनकर केळकर संग्रहालय खुले करण्यात आले. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते डॉ. केळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संग्रहालय सुरू झाले.
डॉ. दिनकर केळकर यांची कन्या रेखा रानडे, पं. वसंतराव गाडगीळ, डॉ. सुरेश गरसोळे आणि श्याम भुर्के यांच्यासह संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे या वेळी उपस्थित होते. संग्रहालयाला भेट देणा-या प्रत्येकाचे तापमान तपासण्यात आले. सॅनिटायझर देऊन मास्कचा वापर केल्याची खात्री करूनच संबंधित नागरिकांना संग्रहालयामध्ये प्रवेश देण्यात आला.
पहिल्याच दिवशी पर्यटकांचा उदंड प्रतिसाद हा आमच्यासाठी सुखद धक्का होता. संग्रहालये ही आपल्या इतिहासाची साक्ष देणारा अमूल्य ठेवा आहेत. नागरिकांनी कायम असाच उदंड प्रतिसाद देत संग्रहालये वाचवावीत, असे आवाहन संचालक
सुधन्वा रानडे यांनी केले.