लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणात पर्यटक युवक बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 02:02 PM2022-07-12T14:02:54+5:302022-07-12T14:05:01+5:30
धरणाच्या धबधब्याकडे भिजण्यासाठी गेलेला तरूण बुडाला...
लोणावळा : लोणावळ्यात वर्षाविहार व पर्यटनासाठी आलेला एक पर्यटक युवक भुशी धरणात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. साहिल सरोज (वय १९, रा. मुंबई) असे या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार साहिल आणि त्यांच्या ग्रुपचे सुमारे २५० पेक्षा अधिक सहकारी पाच बसेसनी लोणावळा व खंडाळ्यात वर्षाविहार व पर्यटनासाठी आले होते. दुपारी सर्व सहकारी हे भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याकडे भिजण्यासाठी गेले होते.
यावेळी धबधब्याच्या मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून येताना साहिलचे पाण्यात नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहत जाऊन तो पुढे काही अंतरावर भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्यावरून सुमारे २५ ते ३० फूट उंचीवरून खाली वाहत जाऊन भुशी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडाला.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करत स्थानिकांच्या मदतीने साहिलचा शोध सुरू केला आहे. त्यासोबतच शोध कार्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. अद्याप शोध मोहीम सुरू आहे.