पर्यटकांनो, हुल्लडबाजी टाळा!

By admin | Published: July 7, 2017 03:30 AM2017-07-07T03:30:23+5:302017-07-07T03:30:23+5:30

पावसाळी पर्यटनासाठी राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असलेला लोणावळा व खंडाळा परिसर पावसाला सुरुवात झाल्यापासून

Tourists, avoid rioting! | पर्यटकांनो, हुल्लडबाजी टाळा!

पर्यटकांनो, हुल्लडबाजी टाळा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असलेला लोणावळा व खंडाळा परिसर पावसाला सुरुवात झाल्यापासून पर्यटकांनी हाऊसफुल होऊ लागला आहे. पर्यटनाचा आनंद घेताना हुल्लडबाजीला आळा घालत पर्यटनाचा आनंद लुटावा, यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

धरणाच्या पायऱ्यांवरील भिंतीला सुरक्षेकरिता काटेतार लावण्यात आली असली तरी काही पर्यटक डोंगरबाजूकडून धरणात उतरण्याचा प्रयत्न करतात. काही तरुण-तरुणी धरणाच्या दक्षिणेकडे असलेल्या डोंगरामधील धबधब्यांखाली वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी धोकादायकपणे डोंगरमाथ्यावर जातात. सहारा पुलासमोरील धबधबा परिसरातदेखील तरुण डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यातून उलट्या दिशेने डोंगरावर जाण्याचा प्रयत्न करतात. लायन्स पॉइंट व टायगर पॉइंट परिसरात सुरक्षेकरिता लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगच्या पुढे दरीच्या तोंडावर बसून सेल्फी काढण्यासाठी जाणे असे धोकादायक प्रकार सर्रास पहायला मिळत आहेत. गिधाड तलावातून वाहणाऱ्या धबधब्याखाली बसणे धोकादायक आहे. यदाकदाचित पाण्याच्या प्रवाहात पाय घसरल्यास थेट दरीत पडण्याशिवाय गत्यंतर नसताना तरुण तरुणाई खबरदारी न घेता हुल्लडबाजी करतात. खंडाळा राजमाची पॉइंट येथे दरीला रेलिंग नसल्याने येथे दरीच्या अगदी तोंडाजवळ जाणे धोकादायक असताना देखील खबरदारी घेतली जात नाही.

पोलीस बंदोबस्त
पावसाळी सिझन बंदोबस्ताकरिता ४७ पोलीस अधिकारी, २३१ पोलीस कर्मचारी, ६३ महिला पोलीस, एक स्ट्रायकिंग फोर्सची मागणी करण्यात आली आहे. १२ सेक्टर तयार करून सिझन बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, यापैकी ८ सेक्टर लोणावळा शहरातील भुशी धरण, वलवण, तुंगार्ली व लोणावळा धरण, राजमाची पॉइंट, कुमार चौक, सहारा पूल, रायवुड कॉर्नर भागासाठी व चार सेक्टर लोणावळा ग्रामीण परिसरातील कार्ला व भाजे लेणी, लोहगड, विसापूर, तुंग व तिकोणा किल्ला, पवना धरण परिसरासाठी नियुक्त करण्यात येणार आहे.

शिवदुर्ग संघटनेकडून अनेक जणांना जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : मावळ तालुक्यात कोठेही आपत्ती आल्यास मदतीसाठी धावून जाणारी संस्था म्हणजे शिवदुर्ग मित्र- लोणावळा. दऱ्या-खोऱ्यांमध्ये अडकलेले पर्यटक, पाण्यात बुडालेले, गड-किल्ल्यांवर भरकटलेले पर्यटक यांना मदतीचा हात देणारी संस्था म्हणून शिवदुर्ग मित्र या अष्टपैलू संस्थेचा लौकिक आहे.
महाराष्ट्रातील गडकोट फिरण्याच्या उद्देशाने लोणावळ्यातील काही तरुण ३५ वर्षांपूर्वी वि. का. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले व त्यांनी दुर्गभ्रमंती सुरू केली. ही भ्रमंती सुरु असताना त्यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व गो. नि. दांडेकर यांच्यासारख्या दिग्गज इतिहासकारांचे मार्गदर्शन लाभले.
इतकेच नाही, तर त्यांच्या समवेत हे तरुण अनेक गडकोटांवर फिरले. पुढे हा छंद वाढत गेला. दुर्गवेड्यांची संख्या वाढत गेली. त्यातून या दुर्गमित्रांनी १९८० मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवदुर्ग मित्र या संस्थेची स्थापना केली.
सुरुवातीला हे सदस्य किल्ल्यांची पायी मोहीम आयोजित करीत. आठ दिवसांत आठ किल्ले, चार दिवसांत चार किल्ले अशा प्रकारे मोहिमा फत्ते करीत असत. पुढे सायकल व नंतर मोटारसायकल मोहिमा आखल्या जाऊ लागल्या.
लोणावळा ते दिल्ली, कन्याकुमारी अशा मोहिमा झाल्या. किल्ले पाहण्याबरोबर गडकिल्ले संवर्धनाचे कार्य संस्था आपले कर्तव्य समजून करीत आहे. यामध्ये किल्ल्यांवर टाक्या स्वच्छ करणे, किल्ल्यांवर वृक्षारोपण करणे, वृक्षांचे संवर्धन करणे, जनजागृती करणे ही कामे संस्था करीत असून, युवकांचा मोठा सहभाग याकामी संस्थेला लाभत आहे. इतिहासाचे जतन करण्यासाठी संस्थेने समरभूमी असलेल्या उंबरखिंडीत विजयस्मारक उभारले आहे. तसेच जाणता राजा या आशिया खंडातील प्रथम क्रमांकाच्या महानाट्याचे आयोजन लोणावळ्यात केले होते.
दुर्गभ्रमंती बरोबरच सह्याद्रीतील उंच सुळक्यांवर चढाई मोहिमा संस्थेने राबविल्या आहेत. गिर्यारोहणासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण संस्थेचे सचिव सुनील गायकवाड, नितेश कुटे, अशोक मते, राजेंद्र कडू, प्रकाश रत्नाकर यांनी नेहरु माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, उत्तरांचल येथून पूर्ण केले आहे.
सर्च अँण्ड रेस्क्यूमध्ये शिवदुर्गचे कार्य मोठे आहे. मागील १२ वर्षांत शिवदुर्ग संस्थेने २५० हून अधिक सर्च अँण्ड रेस्क्यू आॅपरेशन राबवीत अनेकांना प्राणदान दिले आहे.
मावळ परिसरात व जिल्ह्यात डोंगरदऱ्यांमध्ये, जंगलामध्ये अडकलेल्या, हरविलेल्या पर्यटकांसाठी व ट्रेकर्ससाठी शोध मोहिमा राबविल्या जातात. दीड ते दोन हजार फूट खोल दरीतून, तसेच धरणामध्ये, जलाशयामध्ये बुडालेल्या पर्यटकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम संस्था विनामोबदला सामाजिक बांधिलकी म्हणून करीत आहे. संस्थेचे काही सदस्य सर्पमित्र असून, त्यांनी आतापर्यंत हजारो विषारी व बिनविषारी सापांना पकडून त्यांच्या नैसर्गिक आवासात सोडण्यात आले आहे.

रेस्क्यूच्या काही महत्त्वपूर्ण नोंदी
गिधाड तलावाखालील धबधब्यातून वाहून गेलेल्या सहा जणांपैकी तीन जणांना जिवंत व दोन मृतदेह काढण्यात यश.
राजमाची किल्ला रोडवर मोटार लुटणारी व द्रुतगतीवर दरोडा टाकणारी १४ जणांची टोळी रंगेहाथ पकडून दिली.
मळवली येथे नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या १५० जणांना सुखरूप बाहेर काढले.
राजमाची किल्ला परिसरात फिरायला आलेले मुंबईतील लीलावतीबाई पोतदार विद्यालयाचे ३५० विद्यार्थी पाऊस व धुक्यात वाट चुकून दरीत गेले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढले.
मुंबईतील गिर्यारोहकांवर ड्युक्स नोजची चढाई करताना मधमाश्यांनी हल्ला चढविला. त्यांची मधमाश्यांच्या तावडीतून सुटका.
आंबोली धबधब्यातून सुमारे १७०० फूट दरीत वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधून काढला.
राजमाची रोडवरील कातळ धबधबा येथील जंगलात पावसात हरविलेल्या १९ जणांच्या ग्रुपला सुखरूप बाहेर काढले.

पर्यटकांनी घ्यावी खबरदारी
लाखोच्या संख्येने पर्यटक शहरात व पर्यटनस्थळांवर येत असल्याने प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात नेमणे शक्य नसल्याने पर्यटकांनीच स्वयंशिस्त पाळत हुल्लडबाजीला आळा घालत सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. घरी कोणी तरी आपली वाट पहात आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवत सुरक्षितपणे लोणावळा खंडाळा परिसरातील पावसाचा, हिरव्यागार निर्सगाचा, डोंगरांमधून तसेच रस्त्यांच्या कडेने वाहणाऱ्या धबधब्याचा, धुक्याच्या व ऊन सावल्यांच्या लपंडावाचा आनंद घ्यावा.
पर्यटन क्षेत्रातील धरणाच्या पाण्यात उतरू नये. अनेक ठिकाणी तारेचे कुंपण असून देखील काही उत्साही पर्यटक हे कुंपण ओलांडून धरणाच्या पाण्यात उतरून जीव धोक्यात घालतात. मावळातील गड किल्ले व लेणी परिसरात जाताना माहीत नसलेले शॉर्टकट न घेता रुळलेल्या वाटांनीच प्रवास करावा. धबधबाच्या वाटेने अनेक पर्यटक भिजण्याचा आनंद घेण्यासाठी जातात. मात्र, अशा ठिकाणी धोका संभवतो. मद्य प्राशन करून काही पर्यटक या क्षेत्रात हुल्लडबाजी करतात. रस्त्यावर वाहने थांबवून डेकच्या आवाजात नाचत वाहतुकीला अडथळा करतात.

Web Title: Tourists, avoid rioting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.