Tamhini Ghat: पर्यटकांनो काळजी घ्या! ताम्हिणी घाटात ३०० ते ५०० मिमी पाऊस, काही भागात दरडी कोसळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 03:05 PM2024-07-28T15:05:35+5:302024-07-28T15:05:42+5:30
यंदा ताम्हिणी घाटात प्रचंड पाऊस झाला असून काही भागांत दरडी कोसळल्याने घाट रस्ता बंदही करण्यात आला होता
पुणे : यंदाच्या पावसाळी हंगामात घाटमाथ्यावर जून महिन्यात वरुणराजाने ओढ दिली होती. पण, जुलै महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला एका दिवसात शंभर मिमी पावसाची नोंद व्हायची. आता गेल्या चार-पाच दिवसांमध्ये तर तीनशे ते पाचशे मिमी पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर वरुणराजा धो-धो बरसला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला होता. पण, जून महिना कोरडाच गेला. त्यामुळे सर्वांच्या चिंतेमध्ये वाढ झाली होती. धरणांतील साठाही कमी होऊ लागला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली आणि मग संपूर्ण महिना ‘तो’ धो-धो बरसला. पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणेही भरली. त्यानंतर खडकवासला धरणातून विसर्ग सोडण्यात आला आणि काही भागांना पुराचा फटकाही सहन करावा लागला. यंदा पवना धरणात जूनपासून आतापर्यंत १८२४ मिमी, मुळशीत २०७१ मिमी, टेमघरला २१५४ मिमी, पानशेतला १३४६ मिमी तर खडकवासलात ५२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
१ जूनपासून धरणांतील पाऊस
पवना : १८२४ मिमी
कासारसाई : ७०३ मिमी
मुळशी : २०७२ मिमी
टेमघर : २१५४ मिमी
वरसगाव : १३५२ मिमी
पानशेत : १३४६ मिमी
खडकवासला : ५२७ मिमी
ताम्हिणी घाटात धुवाधार
यंदा ताम्हिणी घाटात प्रचंड पाऊस झाला. काही भागांत दरडी कोसळल्या. त्यामुळे घाट रस्ता बंदही करण्यात आला होता. एक दिवसात तीनशे ते पाचशे मिमी पावसाचा उच्चांक या घाटामध्ये पाहायला मिळाला. पण, दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाला असून, आता शंभर मिमीच्या जवळपास पाऊस होत आहे. लोणावळा भागातही गेल्या चार-पाच दिवसांमध्ये प्रचंड पाऊस झाला.
ताम्हिणीत घाटातील पाऊस
दि. १५ जुलै : १५ मिमी
दि. १८ जुलै : ८६ मिमी
दि. १९ जुलै : १६८ मिमी
दि. २० जुलै : १८१ मिमी
दि. २१ जुलै : १६८ मिमी
दि. २२ जुलै : २३० मिमी
दि. २३ जुलै : २६८ मिमी
दि. २४ जुलै : ३०० मिमी
दि. २५ जुलै : ५५६ मिमी
दि. २६ जुलै : २८४ मिमी
दि. २७ जुलै : १४० मिमी