पर्यटकांच्या गर्दीने फुलला लोणावळा, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा ओघ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 02:18 AM2018-12-27T02:18:14+5:302018-12-27T02:18:27+5:30
पर्यटन व थंड हवेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरामध्ये ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्याकरिता पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे.
लोणावळा : पर्यटन व थंड हवेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरामध्ये ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्याकरिता पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. राज्यातील इंग्रजी शाळांना ख्रिसमसची सुटी पडली आहे. या सुटीचा आनंद घेण्याकरिता व थर्टी फर्स्ट, तसेच नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीकरिता लोणावळा व खंडाळा शहरात पर्यटकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. पुढील आठवडाभर ती कायम राहणार आहे.
मंगळवारी ख्रिसमसनिमित्त लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका मुंडे व कर्मचारी वाहतूक नियोजनाकरिता मुख्य चौकांमध्ये कार्यरत होते. पुण्याकडे जाणाºया वाहनांकरिता अंबरवाडी गणपती मंदिर मार्गाकडून इंदिरानगर, तुंगार्लीमार्गे शहराबाहेर जाणाºया पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या वाहनचालकांना शहरात जायचे नाही त्यांनी वाहतूककोंडी टाळत या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर पोलिसांनी केले होते.
छुप्या पद्धतीने हुक्काविक्री
लायन्स पॉइंट हे ठिकाण सायंकाळी सातनंतर पर्यटकांकरिता बंद करण्यात येते. त्यानंतर पॉइंटचे दोन्ही गेट बंद केले जातात. असे असताना काही युवक हे रस्त्याकडेला उभे राहत रात्रीच्या वेळी येणाºया पर्यटकांच्या वाहनांना थांबवून दारू, हुक्का हवाय का, असे विचारत छुप्या पद्धतीने हुक्काविक्री करीत आहेत. राज्यात हुक्काबंदी करण्यात आल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी अनेक वेळा या ठिकाणी अचानक छापा टाकत हुक्का व हुक्क्याची भांडी दरीत फेकून दिली आहेत. त्यानंतर या परिसरातील खुलेआम हुक्काविक्री बंद झाली असली, तरी काही मंडळी आजही छुप्या पद्धतीने हुक्काविक्री करीत आहेत.