फिरायला गेलेले पर्यटक पैशाअभावी अडचणीत
By admin | Published: November 10, 2016 02:14 AM2016-11-10T02:14:42+5:302016-11-10T02:14:42+5:30
आपल्या आवडत्या ठिकाणी पर्यटनासाठी गेला आहात, तिथे मिळणाऱ्या छान वस्तू घ्यायच्या आहेत, खिशात पैसेही आहेत, पण त्या पैशाची किंमत बाजारामध्ये गेल्यावर शून्य आहे
पुणे : आपल्या आवडत्या ठिकाणी पर्यटनासाठी गेला आहात, तिथे मिळणाऱ्या छान वस्तू घ्यायच्या आहेत, खिशात पैसेही आहेत, पण त्या पैशाची किंमत बाजारामध्ये गेल्यावर शून्य आहे हे कळल्यावर काय भावना होईल? तशीच काहीशी अवस्था महाराष्ट्राबाहेर फिरायला गेलेल्या पर्यटकांची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चलनव्यवहारातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाच रद्द केल्याने पर्यटकांसाठी पैसा एका क्षणात ‘खोटा’ ठरला आहे. त्यामुळे पर्यटकांना ‘नो खरेदी’ धोरण अवलंबून केवळ फिरण्याचा आनंद लुटावा लागत आहे.
दिवाळीत किंवा त्यानंतर पर्यटनाला जाण्याचा एक टे्रंड गेल्या काही वर्षांमध्ये विकसित झाला आहे. पर्यटनाला कुठे जायचे, याचे नियोजन कुटुंबामध्ये दिवाळीपूर्वीच एकदोन महिने अगोदर केले जाते. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी भारतातील विविध स्थळांना भेटी देण्यासाठी वैयक्तिक किंवा ट्रूर्स कंपन्यांबरोबर कुटुंबाची स्वारी निघते, यंदाही अगदी सिमला, कुलू-मनालीपासून अमृतसर, डलहौसी, धरमशाळा, राजस्थान, केरळ, दार्जिलिंग या ठिकाणी पर्यटनासाठी लोक गेलेले आहेत. मात्र, मोदींच्या या निर्णयामुळे पर्यटकांची चांगलीच गैरसोय झाली आहे.
पर्यटनासाठी जाताना खिशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा घेऊन गेलेल्या पर्यटकांसाठी
या नोटा एका झटक्यात ‘कागदी’ ठरल्या आहेत.
बाजारात खरेदीसाठी गेल्यानंतर विक्रेते ५०० रुपयांच्या नोटा नाकारात आहेत, हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर तीच परिस्थिती अनुभवास मिळत आहे. करायचे तरी काय? असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे. हैद्राबादला गेलेल्या एका प्रवाशाने आपला अनुभव कथन केला.
या निर्णयानंतर दुकानात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केले आणि एटीएमच्या बाहेर रांगा लागायला सुरूवात
झाली. वाहतूक कंपन्यानीही ५०० रुपयांच्या नोटा घेणे नाकारले. खिशात १०० रुपायांच्या नोटा कमी असल्यामुळे आम्हाला जपून खर्च करावा लागत आहे. कार्डनेच पेमेंट करा, असा आग्रह दुकानदारांकडून होत आहेत. आमच्या काहीजणांच्या खात्यात एवढी रक्कम नाही. त्यामुळे जेवणासाठी एका हॉटेलवाल्याला पैसे गोळा करून देण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.