हिमाचलच्या अतिवृष्टीत पुण्यातील पर्यटक अडकले; सर्व जण सुरक्षित असून अधिकाऱ्यांच्या संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:47 AM2023-07-12T10:47:29+5:302023-07-12T10:49:07+5:30
पुण्यातील अनेक पर्यटक सध्या अतिवृष्टीमुळे मनाली, कुलू, कसोल, मंडी आदी भागांत अडकल्याची माहिती
पुणे : गेल्या चार दिवसांपासून पावसाने उत्तर भारतात कहर माजवला आहे. परिणामी हिमाचल प्रदेशात मोठी हानी झाली आहे. या अतिवृष्टीत हजारो पर्यटक अडकले असून, त्यात पुण्यातील काही पर्यटकांचाही समावेश आहे. त्यांचा संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत पडले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून हिमाचल प्रदेश सरकारशी संपर्क साधण्यात येत असून, दळणवळण बंद झाले असले तरी सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
हिमाचल प्रदेश पर्यटनासाठी गेलेले पुण्यातील अनेक पर्यटक सध्या अतिवृष्टीमुळे मनाली, कुलू, कसोल, मंडी आदी भागांत अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विठ्ठल बनोटे यांनी दिली. ते म्हणाले, ‘पिंपरी चिंचवडमधील सहा पर्यटक रविवारी मनालीतून कुलूकडे जात असताना पावसामुळे रस्ते बंद असल्याने मंडी येथे अडकले. त्यानंतर दोन दिवस त्यांचा संपर्क झाला नव्हता. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मंगळवारी स्थिती सुधारल्यावर याच पर्यटकांनी जवळच्या पोलिस ठाण्यातून घरी संपर्क साधला. त्यामुळे ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा प्रशासन हिमाचल सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात असून, सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये. तेथील दळणवळण ठप्प झाल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.’ हडपसरमधील मगरपट्टा सिटीतील एका खासगी कंपनीतील सहा जण हिमाचलमधील कसोल येथे अडकले आहेत. कुलूमध्ये असताना रविवारी त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर संपर्क झाला नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. या सहा पर्यटकांच्या शोधासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. हिमाचलमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील बनोटे यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही हिमाचल प्रदेश सरकारमधील काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, त्यांनीही याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्ते व पूल बंद केले आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर दळणवळण सुरू होईल. त्यानंतर तेथून पर्यटक बाहेर पडू शकतील. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनही हिमाचल सरकारशी सातत्याने संपर्कात आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने मुंबईतून पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.
नातेवाइकांनी घाबरू नये
पुण्यातील पर्यटकांची माहिती हिमाचल प्रदेश सरकारला कळविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. सर्वजण सुरक्षित असून, नातेवाइकांनी घाबरू नये. - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी