पुणे पालिकेची यंत्रणा कुचकामी म्हणून क्रमांक घसरला नगररचना तज्ज्ञ अनिता गोखले-बेनिंगर - नागरिकांनी डोळस अन् पालिका यंत्रणा सक्षम व्हायला हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:10 AM2021-03-06T04:10:45+5:302021-03-06T04:10:45+5:30
केंद्रीय गृह आणि नगर विकास मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात देशातील १११ शहरांमध्ये, राहण्यासाठी उत्तम असलेल्या शहरांच्या श्रेणीत पुणे शहर हे ...
केंद्रीय गृह आणि नगर विकास मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात देशातील १११ शहरांमध्ये, राहण्यासाठी उत्तम असलेल्या शहरांच्या श्रेणीत पुणे शहर हे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे़ तर बंगळुरू शहर हे प्रथम क्रमांकावर असून, पिंपरी-चिंचवड शहर १६ व्या क्रमांकावर आहे़ दरम्यान, महापालिका श्रेणीमध्ये पुणे शहराला पिंपरी-चिंचवडने मागे टाकले असून, पिंपरी-चिंचवड शहराचा चौथा, तर पुणे शहराचा पाचवा क्रमांक लागला आहे़ या विषयी गोखले यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
गोखले-बेनिंगर म्हणाल्या,‘‘या सर्वेक्षणासाठी संकलित केलेला डाटा हा नागरिकांकडून घेतलेला नाही. यापूर्वी फक्त नागरिकांकडून माहिती घेऊन त्यावर क्रमांक ठरवले जायचे. पण या वेळी महापालिका काम काय करते, ते पाहिले गेले. त्यामुळे आपला क्रमांक घसरला आहे. यावरून आपली महापालिका यंत्रणा काय काम करते, ते दिसते.’’
------------------
आपले शहर उत्तम होण्यासाठी नागरिकांनी डोळस, चौकस व्हायला हवे. पालिकेने त्यांची यंत्रणा सुधारायला पाहिजे. नागरिकांनी तक्रार केल्यावर लगेच त्याचे निराकारण करणे त्यांची जबाबदारी आहे. यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. रस्त्यांवर कचरा पालिका करत नाही, ते नागरिकच करतात. त्यामुळे नागरिकांनी कचरा करू नये. आपला परिसर चांगला ठेवला, तर सर्व शहर स्वच्छ व सुंदर होईल, असे गोखले-बेनिंगर यांनी सांगितले.
------------------------
पालिका ॲपवरील तक्रारींचे निवारण व्हावे
पुणे महापालिकेने नागरिकांना तक्रार देण्यासाठी ॲप दिले आहे. पण त्या अॅपवर खूप लोकं तक्रार दाखल करतात आणि त्या तक्रारी न सोडवताच निकाली काढल्या जातात. तक्रार खरंच सोडविली गेली आहे का? याची तपासणीच केली जात नाही. त्यामुळे नागरिक तक्रारी करून कंटाळतात, पण त्या सोडवल्या जात नाहीत. याबाबत पुणे महापालिकेने विचार करणे आवश्यक आहे. तरच आपला क्रमांक भविष्यात वर येऊ शकेल, असे गोखले-बेनिंगर म्हणाल्या.
----------------