विनापरवाना जिलेटीन, डेटोनेटरची वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:20 AM2021-02-28T04:20:45+5:302021-02-28T04:20:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : विनापरवाना जिलेटिन कांड्या व डेटोनेटरची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला बारामती पोलिसांनी शुक्रवार (दि.२६) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : विनापरवाना जिलेटिन कांड्या व डेटोनेटरची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला बारामती पोलिसांनी शुक्रवार (दि.२६) अटक केली. त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १५४ जिलेटिन कांड्या व २०० डेटोनेटर तसेच ट्रॅक्टर असा ३ लाख ४ हजारांचा माल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी रूपेश साळुंके यांनी फिर्याद दाखल केली. विशाल ज्ञानदेव कोळेकर (रा. नांदल, ता. फलटण, जि. सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. शुक्रवारी (दि.२६) ही कारवाई करण्यात आली. पिंपळी ते डोलेर्वाडी रस्त्यावर एक जण ट्रॅक्टरमधून स्फोटक पदार्थांचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दुपारी सव्वाबारा वाजता पोलिसांनी सापळा रचला. संशयित ट्रॅक्टर येताच पोलिसांनी थांबवला. या ट्रॅक्टरची पाहणी केली असता एका प्लॅस्टिक पिशवीत खाकी रंगाच्या कागदात चार बॉक्स डेटोनेटर वायर तसेच जिलेटिन कांड्या सापडल्या. चालकाकडे स्फोटक पदार्थ वाहतुकीचा परवाना नव्हता. तसेच या पदार्थांची बिलेही त्याला सादर करता आले नाहीत.
पोलिसांनी त्याच्याकडून १५४ जिलेटिन कांड्या व २०० डेटोनेटर तसेच ट्रॅक्टर जप्त केला. त्याच्याकडून ट्रॅक्टरसह जिलेटिन कांड्या व डेटोनेटर हे स्फोटक पदार्थ असा ३ लाख ४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. कोळेकर याच्याविरोधात स्फोटके द्रव्य अधिनियमासह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.