कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:23 AM2021-02-21T04:23:32+5:302021-02-21T04:23:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवत /उरुळी कांचन : मोदीसरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदे करणारे सरकार असून ते फक्त ...

Tractor march against agricultural law | कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर मार्च

कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर मार्च

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

यवत /उरुळी कांचन : मोदीसरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदे करणारे सरकार असून ते फक्त ‘हम दो-हमारे दो’ यांच्यासाठीच देशातील पैशाचा वापर करीत असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी उरुळी कांचन येथील सभेत बोलताना केली, हे शेतकरी व कामगारविरोधी काळे कायदे जोपर्यंत रद्द होत नाहीत तोपर्यंत महात्मा गांधींच्या मार्गाने लढा चालूच राहणार असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात पुणे-सोलापूर महामार्गवरून पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व ट्रॅक्टर रैलीत सहभागी झाले होते.

मोदी सरकारच्या विरोधात ढोल-ताशा वाजवत घोषणा देत ही रॅली यवत मधून सकाळी ११ वाजता उरुळी कांचनच्या दिशेने गेली. या रॅलीमध्ये १०० च्या जवळपास ट्रॅक्टर घेऊन शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते हजर झाले होते. पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत ते उरुळी कांचन अशी पंधरा किलोमीटरची ट्रॅक्टर रॅली काढून ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘नही चलेगी नही चलेगी मोदी की हिटलरशाही नही चलेगी,’ अशा सरकार विरोधी तर ‘जय जवान-जय किसान’ अशी शेतकऱ्यांच्या बाजूने घोषणा दिल्याने पुणे-सोलापूर मार्ग दुमदुमला. शेतकऱ्यांबरोबरच राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे ही काही कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, माजी जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य देविदास भन्साळी, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ गुजर, तसेच १२ तालुक्यातील तालुका अध्यक्ष व ७ नगरपालिकांचे अध्यक्ष आणि महिला काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकारी सहभागी झाले होते.

माजी खासदार अशोक मोहोळ म्हणाले की, कोणताही कायदा करताना घटनेने त्या कायद्यासंदर्भात संसदेमध्ये सरकार पक्ष व विरोधकांच्या प्रतिनिधींना याबाबत आपले विचार मांडण्याची व चर्चा करण्याची संधी देण्याची प्रथा आहे. परंतु ती पायदळी तुडवून या सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात हा काळा कायदा मंजूर केल्याने ७० टक्के शेतकरी समाज असलेल्या या देशात सर्वसामान्य नागरिकाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

देविदास भन्साळी म्हणाले की, हे केंद्र सरकार हम दो-हमारे दो म्हणजे मोदी, अमित शहा, अदानी, अंबानी यांच्यासाठीच जनतेला वेठीस धरत आहे. पेट्रोलचा भाव गगनाला भिडला असतानाही या केंद्र सरकारला सर्वसामान्य नागरिकांची होणारी गळचेपी थांबवण्याची इच्छा होत नाही हे लोकशाहीला मान्य नसणारे कृत्य आहे.

आमदार संजय जगताप म्हणाले की, केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. शेतकऱ्यांची पिळवणूक चालवलेली आहे. ही पिळवणूक थांबवण्यासाठी राज्यभर काँग्रेस पक्षाच्या वतीने या काळ्या कायद्याच्या विरोधात आंदोलने केली जाणार आहे. जिल्ह्यातील आंदोलनाची सुरुवात आजच्या या ट्रॅक्टर रॅलीने झाली आहे.

चौकट

महामार्गावर ट्रॅक्टरच्या रांगा..

दौंड तालुक्यातील शेतकरी यवत येथून ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाले होते. तर पुरंदर तालुक्यातील शेतकरी भुलेश्वर घाटातून खाली येऊन महामार्गालगत भुलेश्वर फाटा येथून रॅलीत सहभागी झाले. भुलेश्वर फाट्यापासून लांबच लांब ट्रॅक्टरच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या. महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

चौकट

यवत पोलिसांनी यवत ते चंदनवाडी दरम्यान महामार्गावर वाहतूककोंडी होणार नाही यासाठी दक्षता घेतली. मोदी सरकार हाय हाय, अहंकारी सरकारला घरी बसवा, शेतकऱ्यांना न्याय द्या, काळे कृषी कायदे मागे घ्या या घोषनांणी परिसर दुमदुमला होता.

फोटो:- यवत मधून जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात काढण्यात आलेली रॅली

Web Title: Tractor march against agricultural law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.